समस्तीपूर (बिहार) : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी आपल्या पती आणि मुलांसह हॉस्पिटल गाठले. तिने हॉस्पिटलकडे आपले रक्त विकत घ्यावे आणि त्या बदल्यात पैसे द्यावे, अशी मागणी केली.
रक्त विकण्यासाठी महिला रुग्णालयात पोहोचली : मिळालेल्या माहितीनुसार, वारिसनगर येथील रहिवासी गुलनाज देवी तिचा पती कमलेश राम आणि दोन मुलांसह सदर हॉस्पिटलच्या रक्तपेढीत रक्ताची विक्री करण्यासाठी पोहोचली. तिला तिच्या 35000 रुपयांच्या कर्जाचा हफ्ता चुकता करण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. महिलेचे म्हणणे ऐकताच रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी लगेच ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली.
मी कर्ज घेऊन शेती केली. पण शेतीत फारसा फायदा झाला नाही. मला आज कर्जाचा हप्ता भरायचा आहे. कर्ज देणाऱ्यांनी आज मला कोणत्याही परिस्थितीत हफ्ता भरण्यास सांगितले आहे. म्हणून मी रक्त विकण्यास आली आहे. यामुळे काही पैशांची गरज भागेल. - गुलनाज देवी, कर्जदार
प्रशासनाकडे अर्जाची प्रतीक्षा : या प्रकरणी वारिसनगरचे गटविकास अधिकारी रणजित कुमार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, महिलेने अर्ज दिल्यास चौकशी करून आवश्यक कारवाई केली जाईल. मात्र सध्या गुलनाज देवी आणि त्यांचे पती कमलेश राम यांनी हा अर्ज वारिसनगर ब्लॉक विकास अधिकाऱ्यांकडे दिलेला नाही.
पीडित कुटुंबीयांनी अर्ज दिला असेल तर अर्जाच्या आधारे तपास करताना मदतीसाठी शक्य ते प्रयत्न केले जातील. ही बाब आमच्या निदर्शनास आली आहे. कुटुंबाशी बोलणे सुरू आहे. - रणजित कुमार, वारिसनगर ब्लॉक विकास अधिकारी
प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह : सरकारचा दावा आहे की ते गरिबांसाठी अनेक योजना राबवत आहे. गरिबांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून कर्ज घेणे आणि हप्ते भरणे ही प्रक्रिया गुंतागुंतीतून मुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र असे असतानाही अशा प्रकरणांमुळे त्या सर्व प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता गुलनाजला प्रशासन कधी मदत करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :