दिसपूर Human Animal Conflict : आसाममध्ये मानव आणि जंगली टस्कर हत्ती यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष होत असल्याचं दिसून येत आहे. पीक कापणीच्या हंगामात हा संघर्ष टोकाला जातो. त्यातही पावसाळ्यात पूर आल्यानंतर टस्कर हत्ती अन्नांच्या शोधात मानवी वस्तीत घुसतात. त्यामुळे भात पीक आणि घरांचं मोठं नुकसान होते. टस्कर हत्ती बेभान होऊन हल्ले करत असल्यानं काही वेळा मानवी जीवितहानीही होते. त्यामुळे हत्ती बंधू या आसाममधील संस्थेनं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. टस्कर हत्तींना आवडणारं नेपियर गवत आणि फळांची लागवड 'हत्ती बंधू' या संस्थेनं जंगलात केली.
काय आहे 'हत्ती बंधू' संस्थेचं कार्य : मानव आणि हत्ती यांचा संघर्ष होत असल्यानं बऱ्याच वेळा मानवी जीवितहानी होते. त्यामुळे मानवाकडून हत्तीची शिकार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याला आळा घालण्यासाठी सुप्रसिद्ध निसर्गप्रेमी प्रदीपकुमार भुयान यांच्या मार्गदर्शनाखाली बिनोद दुलू बोरा हे 'हत्ती बंधू' या संस्थेचं नेतृत्व करत आहे. 'हत्ती बंधू' संस्था हत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचं काम करत आहे.
मानव आणि टस्कर संघर्ष टाळण्यासाठी 'हत्ती बंधू'चे उपाय : हत्ती बंधू या नागाव इथल्या निसर्गप्रेमी संस्थेनं मानव-हत्ती संघर्ष टाळण्यासाठी एक अभिनव उपाय शोधून काढला आहे. हत्ती बंधूनं नेपियर गवत आणि हत्तींना आवडणाऱ्या जंगलातील फळांची लागवड केली आहे. टस्कर हत्तींच्या वस्तीला लागून असलेल्या मैदानी भागात हत्ती बंधूनं हे नेपियर गवत लावलं आहे. हत्ती बंधूच्या अथक परिश्रमानंतर तब्बल 130 एकर जमिनीवर नेपियर गवत लावण्यात आलं आहे. त्यामुळे टस्कर हत्तींचा कळप या गवताकडं वळला आहे. टस्करांना नेपियर गवत जाम आवडत असल्यानं त्यांना अन्नाचा पोष्टिक स्रोत उपलब्ध झाला आहे.
हत्ती मानवी संघर्षाला आळा : टस्कर भातशेतीवर डल्ला मारत असल्यानं मानव आणि हत्ती संघर्ष होत होता. आता मात्र टस्करांना जंगलातच नेपियर गवतासोबत जॅकफ्रूट आणि हत्ती सफरचंद मिळत आहेत. त्यामुळे हत्ती आणि मानव संघर्ष कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळलं आहे. याबाबत ईटीव्ही भारतसोबत बोलताना बिनोद दुलू बोरा यांनी 2018 मध्ये हत्ती बंधू संस्थेनं जंगलातील बिगरशेती जमीन हत्ती कॉरिडॉर म्हणून वापरायला सुरुवात केली. त्यावर मोठ्या प्रमाणात नेपियर गवत आणि जॅकफ्रूट, हत्ती सफरचंद लावले. त्यामुळे या जंगलात 200 टस्क हत्तींना खाद्य उपलब्ध झाल्यानं त्यांना रोखण्यात आम्हाला यश आलं. आता हत्ती मानवी वस्तीत येत नसून भात शेतीचं नुकसानही टळलं आहे", अशी माहिती दिली.
नेपियर गवत हत्तीसाठी अतिशय पौष्टिक : हत्ती बंधू या संस्थेनं केलेल्या नेपियर गवताच्या लागवडीनं हत्तींना अन्न उपलब्ध झालं. मात्र यासाठी हत्ती बंधू संस्थेला मोठे कष्ट करावे लागले. बिनोद दुलू बोरा यांच्या पत्नी मेघना मयूर हजारिका यांच्या मदतीनं नागाव-कार्बी आंगलाँग सीमेवरील रोंगांग गावाजवळील टेकड्यांवर नेपियर गवताची लागवड केली. टस्कर हत्ती या भागात मोठ्या प्रमाणात राहत असून ते या भागातील नेपियर गवतावर ताव मारत आहेत. त्यामुळे मानव आणि हत्ती संघर्ष कमी झाल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा :