बंगळुरु (कर्नाटक) - हिजाबचा वाद ( Hijab controversy ) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मंगळुरू येथील व्हीव्ही कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर निर्बंध असतानाही काही विद्यार्थीनी गुरुवारी (दि. 2 जून) हिजाब घालून कॉलेजमध्ये दाखल झाले. मात्र, या विद्यार्थींना वर्गात प्रवेश नाकारण्यात आला. याशिवाय, उप्पिनगडी शासकीय महाविद्यालय प्रशासनाने हिजाब निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
मंगळूरु विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मंगळूरु विद्यापीठ कॉलेज, हमपनकट्टा येथे हिजाब न घालण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाविरोधात 16 विद्यार्थीनींनी हिजाब घालण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या निर्णयाचे पालन करावे, अशा सूचना त्या विद्यार्थीनींना दिल्या. त्यानंत ते विद्यार्थीनी कॉलेजला आल्या नाहीत. मात्र, आज त्या हिजाब घालून महाविद्यालयात आल्या. त्यामुळे महाविद्यालयाने त्यांना महाविद्यालयात प्रवेश करण्यापासून रोखले. त्यामुळे त्या सर्वजणी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाजवळ बसून होत्या.
उप्पिनगडीमध्ये विद्यार्थी निलंबित : शासकीय महाविद्यालय, उप्पिनगडी येथे सतत हिजाब निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या सहा विद्यार्थींना निलंबित करण्यात आले आहे. हिजाब घालून वर्गात प्रवेश करू नये, या सरकारी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे त्यांनी उल्लंघन केले होते. प्राध्यापकांनी हिजाब घालून न येण्याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र, तरीही त्या हिजाब घालून येत होत्या. त्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने त्यांचे निलंबन केले आहे.