अमृतसर Heroin Drone Seized : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ अंमली पदार्थांच्या तस्करीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला. सुरक्षा दलांनी २ किलो वजनाचं हेरॉईन आणि एक खराब झालेलं पाकिस्तानी ड्रोन जप्त केलं. या हेरॉईनची किंमत तब्बल ३५ कोटी रुपये आहे.
जप्त केलेलं ड्रोन चीन निर्मित : काल (२९ ऑक्टोबर) रात्री सीमेवर ड्रोनच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर बीएसएफ आणि पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळील भैनी गावात संयुक्त शोध मोहीम सुरू केली. ऑपरेशन दरम्यान जवानांनी गावाजवळील शेतातून एक खराब झालेलं पाकिस्तानी ड्रोन आणि ३५ कोटी रुपये किमतीचं २.१४६ किलो हेरॉईनचं पॅकेट जप्त केलं. जप्त केलेलं हे ड्रोन चीन निर्मित DJI Mavic-3 क्लासिक क्वाडकॉप्टर आहे. याशिवाय गेल्या २४ तासांत तरनतारन येथून आणखी एक हेरॉईनचं पाकीट जप्त करण्यात आलं. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
या आधी झालेल्या कारवाया : तीन दिवसांपूर्वी अशाच एका कारवाईत, बीएसएफ जवान आणि पंजाब पोलिसांनी अमृतसर आणि गुरुदासपूरजवळ तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये एक ड्रोन आणि ७ किलो हेरॉइन जप्त केलं होतं. पहिल्या प्रकरणात, अमृतसरमधील भरोपाल गावाजवळील एका शेतातून चीन निर्मित क्वाडकॉप्टर जप्त करण्यात आलं. दुसऱ्या घटनेत, बीएसएफ आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत गुरुदासपूरमधील अधियान गावाजवळील एका शेतातून ६.२७९ किलो वजनाच्या हेरॉईनचं सहा पाऊच असलेलं पाकीट जप्त करण्यात आलं. तर तिसऱ्या घटनेत ३६० ग्रॅम हेरॉइनची बाटली जप्त करण्यात आली. या आधी बीएसएफला २५ ऑक्टोबर रोजी तरनतारनमधील एका शेतातून एक चीन निर्मित ड्रोन आणि १.५ किलो हेरॉईनच्या दोन बाटल्या सापडल्या होत्या.
हेही वाचा :