बंगळुरू - देशात कोरोनाचा कहर असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने आतापर्यंत अनेकांचा बळी घेतला आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्सची हुबळी शाखा चालवणारे मोहन एकबोटे यांचा मुलगा शशांक एकबोटेचा (वय 37) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सामाजिक कार्यातून त्याने आपली ओळख निर्माण केली होती.
कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. कर्नाटकचे माजी केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेते बाबागौडा पाटील यांचेदेखील कोरोनामुळे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. बेळगावीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
देशात गेल्या २४ तासांमध्ये २ लाख, ५९ हजार ५५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या संपूर्ण महिन्यातील ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. १७ मे रोजी पहिल्यांदा एका दिवसातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांपेक्षा खाली आली होती. त्यापूर्वी ७ मे रोजी देशात एकाच दिवसातील सर्वाधिक रुग्णांची (4,14,188) नोंद झाली होती.
कोरोना रुग्णांची संख्या -
देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या सध्या २ कोटी, ६० लाख, ३१ हजार ९९१ झाली आहे. तर, एकूण बळींची संख्या २ लाख ९१ हजार ३३१वर गेली आहे. देशात सध्या ३० लाख, २७ हजार ९२५ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ३ लाख ५७ हजार २९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २ कोटी, २७ लाख, १२ हजार ७३५वर गेली आहे.