म्हैसूर (कर्नाटक) - राज्याचे जल संसाधन मंत्री रमेश जारकीहोळी यांचा सेक्स व्हिडिओ समोर आल्यापासून राजकारण चांगलेच तापले आहे. यावर माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुमारस्वामी रमेश जारकीहोळी यांचे नाव न घेता सीडी प्रकरणावर माध्यमांशी बोलले. या सीडीसाठी ५ कोटी रुपयांची डील झाली होती आणि ही सीडी दोन-तीन महिन्यांपूर्वी बाहेर येणे अपेक्षित होते, असा आरोप एचडी कुमारस्वामींनी केला आहे. तसेच ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ व्हायरल केला त्याला अटक करून चौकशी करावी, अशी मागणी कुमारस्वामींनी केली आहे. तसेच या प्रकरणाला राज्य सरकराने गांभिर्याने घ्यावे, असेही ते म्हणाले.
माझे व्हिडिओ असल्याचेही बोलले जात आहे-
सीडी व्हायरल करणाऱ्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी. पैशांसाठी असे रॅकेट चालवले जात असल्याचेही कुमारस्वामी म्हणाले. माजी मुख्यमंत्र्यांचीही अशाच प्रकारची सीडी असल्याचे काही जण म्हणत आहे, ते कोण आहेत, त्यांना समोर येऊ द्या. कारण अशा वक्तव्यांमुळे लोक आपल्याकडे संशयाने बघत आहे. मात्र, मी असे काहीच केले नसल्याचेही माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले.
काय आहे प्रकरण-
नोकरीच्या आमिषाने बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरी हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष दिनेश कलहळी यांनी हा आरोप केला असून, त्यांनी याबाबतची एक सीडी सुद्धा जाहीर केली आहे. या प्रकारानंतर कर्नाटकच्या राजकारणात नवा भूकंप निर्माण झाला आहे. दरम्यान, काही ठिकाणी जारकीहोळी यांच्या विरोधात निदर्शने सुद्धा करण्यात येत आहेत. दरम्यान या सीडीमध्ये दिसणारे रमेश जारकीहोळीच आहेत की अन्य कोण आहे हे स्पष्ट होणे गरजेचे असून, संबंधित मंत्र्यांच्या चौकशीची सुद्धा कळहली यांनी मागणी केली आहे.
...तर मला फाशी द्या - जारकीहोळी
कुलहळ्ळी या व्यक्तीला मी ओळखत नाही. ती युवती कोण मला माहिती नाही. मला त्या सीडीची ही कोणतीच माहिती नाही. असे घाणेरडे कृत्य आपण करणार नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊ द्या. चूक असल्यास मला फाशी द्या, अशी प्रतिक्रिया रमेश जारकीहोळी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.
हेही वाचा -अश्लील सीडी प्रकरण : रमेश जारकीहोळी यांचा राजीनामा