चंदीगड - दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, प्रदूषण आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी फटाके खरेदी-विक्रीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात आता हरियाणाचाही समावेश झाला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत फटाके खरेदी-विक्रीला बंदी घातली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
हरियाणा आणि दल्ली एकमेकांच्या जवळ आहेत. दिल्लीमध्ये सध्या प्रदुषणाची मोठी समस्या आहे. हिवाळ्यात तर समस्या उग्र रूप धारण करते. त्यामुळे यावर्षी दिल्लीत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. दिल्ली पाठोपाठ आता हरियाणामध्ये देखील फटाके खरेदी-विक्रीला बंदी घालण्यात आली. पश्चिम बंगाल आणि ओदिशाने या अगोदरच फटाक्यांवर बंदी घातली आहे.
दिल्लीत नागरिकांनीच केली होती फटाके बंदीची मागणी -
दिल्ली-एनसीआरमध्ये कोविड रुग्णांच्या संख्येत अलिकडच्या काळात वाढ झाली आहे. प्रदूषणाची समस्याही गंभीर आहे. हिवाळ्याच्या दरम्यान धुके, हवेबरोबर धूळ, माती आणि प्रदूषणाचे कण एकत्र येवून भीषण हवा प्रदूषण होते. याचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे येथील 79 टक्के रहिवाश्यांनी दिवाळीनिमित्त फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेता सरकारने फटाक्यांवर बंदी घातली आहे.
महाराष्ट्रातही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन -
कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला. दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे खबरदारी घेऊन महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.