गुरुग्राम - देशात कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत, विवाह सोहळे पार पडत आहेत. गुरुग्रामच्या उल्लवास गावात नवरी मुलीच्या मामाने लग्नातील उपस्थितांना 5 हजार 100 मास्कचे आणि सॅनिटायझरचे वितरण केले.
कोरोनापासून वाचवण्यासाठी सरकारने दिलेल्या आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्वाचे आहे, हा संदेश त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला. लग्नातील पाहुण्यांनीही त्यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले. कोरोनाच्या सावटामुळे यापुढे होणाऱ्या लग्नसोहळ्यांवर आता विशेष बंधने आली आहेत. तसेच लॉकडाउनच्या कालावधीत सर्व नियम सांभाळून पार पडलेल्या विवाह सोहळ्यांमध्ये मास्कचा ट्रेंड बघायला मिळाला.
हरयाणात कोरोना रुग्णांत वाढ -
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. हरयाणामध्ये सध्या 16 हजार 673 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2 लाख 18 हजार 443 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 2 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशात सध्या 4 लाख 22 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 1 लाख 38 हजार 648 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे.