अहमदाबाद - तौक्ते चक्रीवादळात गिर अभयारण्यातील 18 सिंह बेपत्ता असल्याची बातमी प्रसारमाध्यमांत पसरली होती. यानंतर वनविभागाने स्पष्टीकरण जारी करत सिंह सुरक्षीत असल्याचे सांगितले. राज्य सचिव राजीवकुमार गुप्ता यांनीही ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात सिंह पाण्याचा प्रवाह ओलांडताना दिसत आहेत. हे दृश्य वनविभागाच्या कर्मचार्यांनी कैद केले.
चक्रीवादळाविषयी इशारा मिळाल्यानंतर वनविभागाने सर्व सिंहांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. गेल्या अनेक वर्षांपासून सिंह राजूला, जाफराबाद, उना, कोडिनार आणि महुआ किनारपट्टीच्या भागात वारंवार येत असतात. चक्रीवादळामुळे या भागात कोणताही सिंह मरण पावला नाही किंवा बेपत्ता झालेला नाही.
गिर अभयारण्य -
आशियाई सिंहांसाठी प्रसिद्ध गुजरातमधील गिर अभयारण्य प्रसिद्ध आहे. ह्या जंगलाला 1995 साली अभयारण्याचा दर्जा मिळाला. ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 1412 चौरस किमी असून, पैकी 258 चौरस किमी पूर्णतः राष्ट्रीय उद्यान व 1153 चौ. किमी वन्यजीव अभयारण्य म्हणून संरक्षित आहे.
किनारपट्टीसह सौराष्ट्राचेही मोठे नुकसान -
गुजरातच्या किनारपट्टीसह सौराष्ट्र भागाचेही मोठे नुकसान झाले आहे. राज्यात या वादळामुळे 13 जणांचा जीव गेला असून घरे, झाडे, वीजेचे खांब यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. सुमारे 96 तालुक्यांमध्ये चार इंचाहून अधिक पाऊस झाला. सहा तालुक्यांमध्ये आठ ते नऊ इंच पावसाची नोंद झाली. तर, दक्षिण गुजरातमध्ये तब्बल 14 इंच पावसाची नोंद करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील तातडीच्या मदत कार्यांसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.