सुरत (गुजरात) Gujarat Mass Suicide : गुजरातच्या सुरतमधून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका फर्निचर व्यावसायिकाच्या कुटुंबातील सात जणांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन वृद्ध, दोन तरुण आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून सुसाईड नोट जप्त केली. फर्निचर व्यापार्यानं कोणाला तरी पैसे दिले होते. मात्र पैसे परत न मिळाल्यानं त्यानं हे कठोर पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
काय आहे प्रकरण : सुरतमधील अडाजण येथे एका अपार्टमेंटमध्ये फर्निचर व्यावसायिक मनीष सोळंकी कुटुंबासह राहात होते. त्यांच्या कुटुंबात वडील, आई, पत्नी आणि तीन मुलं आहेत. फर्निचर व्यवसायात असलेल्या मनीष यांनी कोणाला तरी पैसे दिले होते. मात्र ते पैसे परत मिळण्याची शक्यता नसल्यानं निराश होऊन त्यांनी काल (२७ ऑक्टोबर) रात्री कुटुंबासह आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष यांनी आधी आई-वडील, पत्नी आणि तीन मुलांना विष पाजलं. या सहा जणांच्या मृत्यूनंतर त्यांनीही आत्महत्या केली. पैसे परत न मिळाल्यानं हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे.
शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली : मनीष सोळंकी यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या रात्रीच्या जेवणात विष मिसळलं आणि त्यानंतर घरात आत्महत्या केली. शेजाऱ्यांना विषारी पदार्थाचा वास आल्यानंतर संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र दरवाजा कोणीही उघडला नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.
सुसाईड नोटमध्ये कोणाचंही नाव नाही : घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेले. तपासासाठी पोलीस एफएसएल विभागाचीही मदत घेत आहेत. मनीष सोळंकी यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, अनेकांनी त्यांचे पैसे परत केले नाहीत. तसंच त्यांच्याकडे अनेक लोकांचे पैसे देणं आहे. मात्र मनीष यांनी त्यांच्या एक पानाच्या सुसाईड नोटमध्ये कोणाचंही नाव लिहिलेलं नाही.
हेही वाचा :