नवी दिल्ली - केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज 40 वा दिवस आहे. शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात चर्चेची सातवी महत्त्वपूर्ण फेरी आज पार पडणार आहे. रविवारी चर्चेच्या एक दिवस आधी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत बैठक घेतली. कृषी आंदोलन लवकरात लवकर सोडवण्याच्या सरकारच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. एका महिन्याहून अधिक काळापासून शेतकरी निदर्शने करीत आहेत. शेतकरी व सरकार यांच्यात सहा वेळा चर्चा झाली आहे. मात्र, चर्चा निष्फळ ठरली असून तोडगा निघालेला नाही. सरकारने मागणी मान्य केली नाही. तर प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेड काढण्यात येईल, असे संयुक्त किसान मोर्चा म्हटलं आहे.
मध्यम मार्गाच्या सर्व संभाव्य पर्यायांवर चर्चा -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तोमर सिह यांनी कृषी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राजनाथ सिंह यांच्यासोबत मध्यम मार्गाच्या सर्व संभाव्य पर्यायांवर चर्चा केली. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये कृषिमंत्री असलेले राजनाथ सिंह पडद्यामागे आंदोलनावर तोडगा काढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत.
थंडी-पावसातही सुरुये आंदोलन..
कडक थंडी आणि आता पाऊस पडल्यानंतरही दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी ठाण मांडले आहे. कायदे रद्द न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आंदोलनस्थळी पाणी साचले आहे. मात्र, शेतकरी माघार घेण्यास तयार नसून, आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही येथून हलनार नाही, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. याठिकाणी 40 प्रमुख शेतकरी संघटनांसह देशभरातील सुमारे 500 शेतकरी संघटनांचे हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. 26 नोव्हेंबरपासून दिल्लीतील, सिंघू आणि टीकरी सीमेवर शेतकऱ्यांनी मुक्काम ठोकला असून सहा महिने तेथेच आंदोलन करण्याची तयारी ठेवली आहे.
शेतकऱ्यांचा मृत्यू -
केंद्राच्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणार्या 35 पेक्षाअधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कुंडली सीमेवर पंजाबमधील बलबीरसिंग गोहाना आणि निर्भय सिंग या दोघांचा मृत्यू झाला आहे. युधिष्ठिर सिंह नावाच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पीजीआय चंदीगढमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर थंडीमुळे हृदयविकाराचा झटका आल्याने शेतकरी जगबीर (66) यांचा मृत्यू झाला. मृत्यूचे वास्तविक कारण पोस्टमॉर्टमनंतर समोर येईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला आहे. तर काहींनी सरकार मागण्या मान्य करत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे.