नवी दिल्ली Govt of India Emergency Alert : मंगळवारी देशातील अनेक अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) वापरकर्त्यांना केंद्र सरकारकडून एक नमुना संदेश प्राप्त झाला. सरकारनं हा नमुना संदेश पाठवून 'इमर्जन्सी अलर्ट सिस्टम' (Emergency Alert System) ची चाचणी केली आहे. देशभरातील वापरकर्त्यांना 'इमर्जन्सी अलर्ट : एक्स्ट्रीम' असं लिहिलेल्या नोटिफिकेशन मिळाल्या होत्या.
काय होतं मॅसेजमध्ये : या फ्लॅश मेसेजमध्ये लिहिलं होतं की, 'हा नमुना संदेश भारतीय दूरसंचार विभागानं सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टमद्वारे पाठवलेला आहे. कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करा. यावर तुम्ही कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेल्या अखिल भारतीय आपत्कालीन सूचना प्रणालीची तपासणी करण्यासाठी हा संदेश पाठवण्यात आलाय. सार्वजनिक सुरक्षा वाढवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर सूचना देणे हा या प्रणालीचा उद्देश आहे', असं या संदेशात नमूद केलं होतं. दूरसंचार विभागानं सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीमद्वारे सर्व Android आणि iOS फोनवर सकाळी ११:३० वाजता हा संदेश पाठवला होता.
सोशल मीडियावर यूजर्सच्या प्रतिक्रिया : स्मार्टफोनवर अलर्ट मिळाल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल विचारणा केली. एका यूजरनं लिहिलं की, 'इतर कोणाला असा संदेश मिळाला का? जीव वाचवण्यासाठी ही 'इमर्जन्सी अलर्ट सिस्टीम' खूप उपयुक्त ठरू शकते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा हा चांगला उपक्रम आहे, असं दुसऱ्या यूजरनं लिहिलं.
याआधीही अशा सूचना प्राप्त झाल्या होत्या : सेल ब्रॉडकास्टिंग सिस्टीमनुसार, मोबाईल ऑपरेटर आणि सेल ब्रॉडकास्ट सिस्टमच्या आपत्कालीन चेतावणी प्रसारण क्षमतेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अशा चाचण्या नियमितपणे घेतल्या जातात. भूकंप, त्सुनामी किंवा अचानक आलेला पूर यांसारख्या आपत्तींना तोंड देण्याची तयारी सुधारण्यासाठी सरकार राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत काम करत आहे. देशभरातील मोबाइल वापरकर्त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही अशाच प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या.
हेही वाचा :
- NPCI Launched Hello UPI : आता आवाजाद्वारे होणारं यूपीआय ट्रान्झॅक्शन; म्हणा हॅलो यूपीआय, त्वरित केले जाईल पेमेंट
- Google layoff : गूगलने केली पुन्हा एकदा टाळेबंदी; अल्फाबेटने शेकडो कर्मचार्यांना टाकले काढून
- Withdrawn Cash without ATM card : आता एटीएममधून कार्डशिवायही काढता येतील पैसे; जाणून घ्या प्रोसेस...