नवी दिल्ली : देशातील नागरिकांना नुकतचं टोमॅटोच्या दरवाढीमुळे हतबल व्हावं लागलं होतं. त्यानंतर कांद्याची दरवाढ होण्याचे संकेत मिळत होते. मात्र केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कांद्यांचा पुरवठा वाढून ग्राहकांनी आणि शेतकऱ्यांना वेठीस धरण्यास आळा बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थ मंत्रालयानं याबाबतचं परिपत्रक काढून 31 डिसेंबरपर्यंत कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
देशातून 9.75 लाख टन कांद्याची निर्यात : भारत हा आशियातील सगळ्यात मोठा कांदा निर्यात करणारा देश असल्याचा दावा करण्यात येत आहे. भारतामधून बांगलादेश, मलेशिया आणि यूएई आदी देशांना कांदा निर्यात करत आहे. त्यातही बांगलादेश, मलेशिया आणि यूएई या देशात भारतीय कांद्याला चांगला भाव मिळतो. देशांतर्गत बाजारपेठेत आगामी सणासुदीत कांद्याचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिली. देशातून 1 एप्रिल ते 4 ऑगस्ट या दरम्यान 9.75 लाख टन कांद्यांची निर्यात करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
कांद्याच्या निर्यातीला आळा घालण्यासाठी शुल्कवाढ : सध्या देशातील कांदा परदेशात निर्यात करण्यासाठी व्यापारी आग्रही असतात. त्यामुळे कांद्याची निर्यात अलिकडं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सरकारनं कांद्यांच्या निर्यातीला आळा घालण्यासाठी निर्यात शुल्क वाढ केल्याचं रोहित कुमार सिंग यांनी सांगितलं. ग्राहक व्यवहार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कांद्यांची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत शनिवारी 30.72 रुपये होती, तर कमाल किंमत 63 रुपये होती. किमान किंमत 10 रुपये इतकी होती. दिल्लीत शनिवारी कांद्याचा भाव 37 रुपये होता, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
स्थानिक पातळीवर वाढणार पुरवठा : सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आहे. स्थानिक पातळीवर पुरवठा वाढून कांद्यांचे भाव स्थिर ठेवता येणार आहे. त्यासह साठेबाजांवर मोठं संकट यामुळे ओढवणार आहे. सध्या दिल्लीत सरकारी भावानं कांदा 37 रुपये प्रति किलो दरानं मिळत आहे.
2 हजार टन 'बफर स्टॉक' कांदा वितरित : सरकारनं यावर्षी 3 लाख टन कांद्याचं 'बफर उत्पादन' म्हणजे अतिरक्त साठा ठेवला आहे. गेल्या आठवड्यापासून प्रमुख ठिकाणी घाऊक बाजारात त्याचा पुरवठा करण्यात येत आहे. आतापर्यंत, 2 हजार टन 'बफर स्टॉक' कांदा दिल्ली, आसाम, हिमाचल प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील घाऊक बाजारात विकल्याची माहिती रोहित कुमार सिंग यांनी दिली आहे. ऑक्टोबरपासून नवीन कांदा बाजारात येईपर्यंत ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये 'बफर स्टॉक'मधील कांदा बाजारात वापरला जाणार आहे.