भोपाळ : झाबुआच्या सोंडवा पोलिस ठाण्यात 21 जुलै रोजी एका आदिवासी कुटुंबाने 4 पोलिसांविरुद्ध सोन्याची नाणी चोरल्याची तक्रार केली होती. ही तक्रार ऐकून पोलिसांना धक्काच बसला. एक तर मजूर सोन्याची नाणी चोरीला गेल्याची तक्रार करत होते, आणि वरून पोलिसांवरच चोरीचा आरोप करत होते. एसपी हंसराज सिंह यांना तत्काळ या प्रकरणाची माहिती देण्यात आली. त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यास सांगितले.
गुजरातमध्ये उत्खननात 240 नाणी सापडली : प्राथमिक तपासात चार पोलीस स्टेशन प्रभारी विजय देवार, हेड कॉन्स्टेबल सुरेश चौहान, कॉन्स्टेबल राकेश देवार आणि वीरेंद्र सिंह यांना निलंबित करण्यात आले. मात्र या आदिवासी मजूर कुटुंबाकडे इतकी सोन्याची नाणी कुठून आली हा खरा प्रश्न आहे. आरोप करणारी महिला बेजडा गावची रहिवासी असून तिचे नाव रामकुबाई भाडिया आहे. या महिलेने पोलिसांना सांगितले की, ती आपल्या कुटुंबासह गुजरातमध्ये मजुरीचे काम करण्यासाठी गेली होती. उत्खननादरम्यान तिला 240 नाणी सापडली. ती सोन्याची आहेत, की आणखी कशाचे ते समजले नाही. तिने येथे आणून त्यांना घरातच जमिनीखाली गाडले.
पोलीस नाणी घेऊन पळून गेले : मात्र ही गोष्ट हळूहळू परिसरात पसरली आणि 19 जुलै रोजी 4 पोलीस त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी त्यांना धमकावले आणि संपूर्ण घर खोदून घेतले. नाणी सापडताच ते घेऊन पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच आदिवासींनी पोलीस ठाणे गाठले आणि हा किस्सा समोर आला. हे प्रकरण गुजरातशी संबंधित असल्याने गुजरात पोलीसही यात शामिल झाले. गुजरात पोलिसांनी चौकशीसाठी आदिवासी कुटुंबाला ताब्यात घेतले.
पाचव्या जॉर्जची नाणी कशी मिळाली : या संपूर्ण कथेत एक प्रश्न अजूनही अनुत्तरित होता की या आदिवासी कुटुंबाला जॉर्ज पंचमच्या काळातील ही नाणी कशी मिळाली? याचे उत्तर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी दिले. त्यांनी सांगितले की, नाणी सापडलेले आदिवासी कुटुंब दक्षिण गुजरातमधील एका वडिलोपार्जित घरात खोदकाम करण्यासाठी गेले होते. येथेच त्यांना ही नाणी सापडली आणि त्यांनी ती लपवून ठेवली. सापडलेल्या नाण्यांवर जॉर्ज पंचम यांचे कोरीवकाम आहे.
येथे सापडली नाणी : पोलिसांनी सांगितले की, ते खोदकाम करत असलेले घर गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील बिलीमोरा शहरातील बंदर रोडवर आहे. कंत्राटदार सर्फराज कराडिया याला याचे काम देण्यात आले होते. सरफराज मध्यप्रदेशच्या झाबुआ आणि अलिराजपूर या आदिवासी जिल्ह्यांमधून मजूर खोदण्यासाठी आणतो. प्रकरण गुजरातशी संबंधित असल्याने येथील पोलीसही सक्रिय झाले आणि त्यांनी आदिवासींना चौकशीसाठी गुजरातला नेले.
नाण्यांची किंमत किती आहे : जप्त केलेल्या नाण्यांची किंमत तपासण्यासाठी पोलिसांनी सोनाराशी संपर्क साधला. तपासादरम्यान हे नाणे खऱ्या सोन्याचे असून त्यावर जॉर्ज पंचम असे लिहिलेले असल्याचे आढळून आले. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 1922 मध्ये ब्रिटीश राजवटीत हे नाणे वापरले जायचे. सोनाराच्या म्हणण्यानुसार, या 240 नाण्यांची भारतातील किंमत 1.56 कोटी रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्यांची किंमत 7.20 कोटी रुपये आहे. सध्या पोलिसांकडे एकच नाणे असून, उर्वरित नाणी शोधण्यासाठी फरार चार पोलिस आणि दोन मजुरांचा शोध घेणे सुरू आहे.
हेही वाचा :