हैदराबाद - 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर युट्युबर गौरव वासन याने प्रतिक्रिया दिली आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना गौरव वासन म्हणाले की, मागील वेळी त्यांना भेटलो तेव्हा ते चांगले होते. गेल्या वर्षी त्यांनी जे काही म्हटले होते, त्याबद्दल त्यांनी वारंवार माफी मागितली होती.
कांता प्रसाद यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर ओढवलेल्या स्थितीबाबत युट्युबर वासन हे ईटीव्ही भारतशी फोनवर बोलताना म्हणाले, की जेव्हा मी त्यांना शेवटी भेटलो, तेव्हा ते चांगले होते. मी त्यांना सांगितले, की गतवर्षी मी तुम्हाला मदत केली होती. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मदत करेन. त्यांच्या भेटीनंतर माझ्यात आणि त्यांच्यात कोणताही गोंधळ राहिला नाही.
हेही वाचा-कायद्याच्या अंमलबजावणीबाबत संसदीय समितीची ट्विटर प्रतिनिधींना बैठकीत विचारणा
वर्षभर मानसिक धक्क्यातून गेलो-
फुड ब्लॉगर गौरव म्हणाले, की जेव्हापासून बाबा का ढाबाबाबत वाद झाला. तेव्हापासून मानसिक धक्क्यातून गेलो आहे. जेव्हा बाबा यांनी सार्वजनिकपणे चुक झाल्याचे मान्य केले, तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला होता. मलाही कुटुंब आहे. मीदेखील वादामुळे वर्षभरात मानसिक दबावातून गेलो आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी चूक मान्य केल्याने काहीसा मला दिलासा मिळाला. आता, हे घडले आहे. प्रत्येकजण मला कॉल करत आहे. मी काय बोलणार आणि मी काय करू शकतो?
हेही वाचा-पीएमसी बँक तोडगा : आरबीआयकडून सेंट्रमला लघू वित्त बँक स्थापण्याची परवानगी
कांता प्रसाद यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू-
कांता प्रसाद यांचा मुलगा आझाद यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, की त्यांना अतिदक्षता वॉर्डमध्ये दाखल केले आहे. व्हेटिंटेलवर त्यांना सपोर्ट दिला आहे. त्यांची स्थिती नाजूक पण स्थिर आहे. गतवर्षी प्रसाद यांनी युट्युबर गौरव वासन याच्याविरोधात तक्रार केल्याने आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
संबंधित बातमी वाचा-'बाबा का ढाबा'च्या मालकाने दारू पिऊन खाल्ल्या झोपेच्या गोळ्या; रुग्णालयात दाखल