पणजी - कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी मागील वर्षभरापासून प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे सरकारवर केवळ टीका करण्याऐवजी काही मार्गदर्शक सुचना दिल्यास अधिक संयुक्तिक ठरेल. ज्याचा व्यवस्थापनाकरिता उपयोग होईल, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोमंतकियांना केले.
डॉ. सावंत यांचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु, कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम न करता कोविड नियंत्रणासाठी काय करता येईल, यासाठी त्यांनी राज्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही -
यावेळी डॉ. सावंत म्हणाले, गोव्यात कोरोनामुळे दररोज होणारे मृत्यू खूप दु:खदायक आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार सर्व उपाययोजना करत आहे. त्याला जनतेकडून सहकार्य आवश्यक आहे. ज्यांना लक्षणे दिसतात अशांनी वेळीच तपासणी करून घरी अलगिकरणात रहावे. तर ज्यांना शक्य नाही अशांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे. संक्रमण रोखण्यासाठी सरकारने विविध निर्बंध लागू केले आहेत. मात्र, लॉकडाऊन हा त्यावरील उपाय होऊ शकत नाही.
लॉकडाऊनमुळे काय झाले हे मागील वर्षी सर्वांनी अनुभवले आहे. त्यामुळे काहींना रोजगार गमावावा लागला. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कोरोना पुढील महिने राहणार आहे. अशावेळी त्याला प्रतिबंध करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर बाळगून लोकांनी गोवा कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.
लसीकरणाचे आवाहन -
सावंत यांनी शनिवारी सकाळी खासगी डॉक्टरांशी चर्चा केली आहे. तसेच जे कोणी यामध्ये सहकार्य करण्यास इच्छुक आहेत, अशांनी पुढे यावे, असे आवाहन करतानाच डॉ सावंत म्हणाले, गोव्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत अडीच लाख लोकांना लस घेतली आहे. तर सर्वच नागरिकांना मोफत लस देण्यासाठी कोविशिल्ड लस सरकारने मागवली आहे. लोकांनी लस घेऊन मृत्यू दर कमी करण्यासाठी सहकार्य करावे.
व्होकल फॉर लोकल उपक्रम -
मुख्यमंत्री म्हणून पदाचा ताबा घेतल्यानंतर राज्य स्वयंपूर्ण बनविण्यासाठी सरकारच्या विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गोवा स्वयंपूर्ण बनविण्याचे लक्ष निर्धारित केले आहे, असे सांगून डॉ सावंत म्हणाले, शेती, फलोत्पादन, दुग्धोत्पादन यामध्ये तर सध्या स्वयंपूर्ण बनण्याचे लक्ष आहे. त्यामुळे 'व्होकल फॉर लोकल' उपक्रम राबविला जात आहे. म्हादईचा लढा जिंकण्याचा विश्वास आहे. तसेच खाण महामंडळ स्थापन करून खाण उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
गोव्यात दोन ऑक्सिजन प्लांट उभारणीला मंजूरी -
दरम्यान, प्लाझ्माची आवश्यकता विचारात घेता राज्यांनी पुढे यावे. त्यांना आवश्यक सहकार्य आणि प्रमाणपत्र दिले जाईल, असे सांगून डॉ सावंत यांनी कोविड रुग्णांवर उपचार सुरू असलेल्या गोव्यातील सध्या तीन रुगणालयांचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले. तसेच गोव्यात दोन ऑक्सिजन प्लांट उभारणीला मंजूरी दिल्याबद्दल आणि सहकार्यासाठी केंद्र सरकारचे आभार मानले. यामधील पहिला प्लांट पुढील पंधरा दिवसांत सुरू होईल. त्याबरोबरच वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन 15 मे पर्यंत नव्याने उभारलेल्या सुपरस्पेशलिटी इस्पितळाचे कोविड रुग्णालयात रुपांतरण करून तेही कार्यान्वित केले जाईल, असेही ते म्हणाले.
सक्रीय रुग्ण संख्या 12 हजारांहून अधिक -
गोव्यात आज दिवसभरात 1,540 नवे कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. ज्यामध्ये सक्रीय रुग्ण संख्या 12 हजार 78 झाली आहे. तर 17 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत गोव्यातील मृतांची संख्या 993 झाली आहे. 485 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तरीही बरे होण्याचा दरात घसरण सुरू असून आज ती 82.61 टक्के झाली. गोव्यात आतापर्यंत 62 हजार 113 जणांनी कोरोनावर मात केली आहे.