पणजी - विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राज्यात भाजपचे मंत्री सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. डिजिटल मीटर बसविण्याच्या प्रक्रियेवरून वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी परस्पर विरोधी खात्यावरच टीका करत भाजपातील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आणली आहे.
लोबो भाजपात नाराज -
कळनगुट चे आमदार मायकल लोबो त्याच्या मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविणार असून आपल्या पत्नीला शिवोली मतदारसंघातून मैदानात उतरविणार आहेत. मात्र मागच्या महिन्यात राज्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षात घराणेशाहीस थारा दिला जाणार नाही, असे सूचक वक्तव्य करून पक्षात एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला तिकीट दिले जाणार असल्याचे सूचक वक्तव्य करून लोबो यांना आधीच इशारा दिला आहे. म्हणून नाराज असणारे लोबो सध्या पक्षविरोधी वक्तव्य करून आपली नाराजगी व्यक्त करत आहेत.
मायकल लोबो यांनी मला शहाणपण न शिकविता आपल्या कचरा व्यवस्थापन खात्याकडे लक्ष द्यावे, अशी उपरोधिक टीका वाहतूक मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो यांनी आमदार मायकल लोबो यांच्यावर केली होती.
म्हाव्हीन यांची एकाधिकारशाही - लोबो
म्हाव्हीन हे सर्व पक्ष फिरून भाजपात आले आहेत, त्यांची त्यांच्याच मतदारसंघात एकाधिकारशाही असून ही गोष्ट त्यांच्या वयाला शोभत नाही. मी माझ्या खात्याचे काम योग्यप्रकारे करत असून त्यानी टॅक्सीचालकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, असा प्रतिटोला मायकल लोबो यांनी गुडीन्हो यांना लगावला.