चमोली - उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यावर मोठं नैसर्गिक संकट ओढवलं आहे. रैनी गावात असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी हिमकडा कोसळल्यानं मोठी हानी झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. बाधित भागात अडकले असाल किंवा कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तर 1070, 9557444486 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यातील जोशीमठ येथील बद्रीनाथ मार्गावर ही घटना घडली. नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी स्वाती भदौरिया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने नदीपात्राजवळील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. आपत्ती निवारण पथकेही रवाना झाली आहेत. या घटनेत नक्की किती जिवितहानी झाली याची माहिती मिळाली नाही. घटनास्थळाजवळील नागरिकांनी या पूराचा व्हिडिओ काढला असून यामध्ये पुराचे तांडव दिसत आहे.
धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचं मोठं नुकसान झालं आहे. अलकनंदा नदीच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. लोकांच्या सुरक्षेचा विचार करता स्थानिक प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरवात केली आहे.तसेच नदीमार्गातील सर्व गावांना सर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हिमनदी फुटल्याने डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पाण्यासह दगड मातीचा लोंढा खाली आला. यात 150 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.