नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये मुस्लिम व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात युपी पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी यांना जातीय अशांतता पसरवल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठविली आहे. एका आठवड्याच्या आत निवेदन नोंदवण्यासाठी त्यांना लोणी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आहे.
ट्विटर इंडियाविरोधात लोणी पोलीस ठाण्यात अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही लोकांनी त्यांच्या ट्विटर हँडलचा उपयोग समाजात द्वेष पसरवण्यासाठी केला आहे आणि ट्विटरकडून या संदर्भात कोणतीही दखल घेतली गेली नाही, असे नोटीसीत म्हटलं आहे.
गाझियाबादमधील एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण आणि दाढी कापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्वरा भास्करवर मारहाणीचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करून घटनेला जातीय रंग दिल्याचा आरोप आहे.
काय प्रकरण?
गाझीयाबादमधील व्हायरल व्हिडिओत काही तरुण वृद्ध मुस्लिम व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. 'जय श्रीराम' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देण्याची बळजबरी हल्लेखोरांनी आपल्यावर केली. मोबाइल काढून घेतला आणि चाकूने आपली दाढी कापली, असे पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ति अब्दुल समद सैफी हे बुलंदशहरातील रहिवासी आहेत. गेल्या 5 जूनला ते लोनी बॉर्डरच्या बेहटा येथे पोहचले. अब्दुल समद तेथून एका अन्य व्यक्तिसोबत आरोपी प्रवेश गुज्जरच्या घर बंथला गेले होते. पीडित अब्दुल समद ताबीज बनवण्याचे काम करतात. ताबिजचा प्रभाव उलटा झाल्यानंतर आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पीडित व्यक्तीने आपल्या धर्मामुळेच लक्ष्य केल्याचा आरोप केला.