कोलकाता - भाजपाला रामराम ठोकत मुकुल रॉय यांनी पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2017 मध्ये टीएमसी सोडत भाजपाचे कमळ त्यांनी हाती घेतले. आता तब्बल चार वर्षानंतर त्यांची घरवापसी झाली आहे. यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘घर का लडका घर वापस आया' अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आता तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांची काय भूमिका राहील, हेही ममतांनी स्पष्ट केले.
रॉय यांनी टीएमसीत प्रवेश केल्यानंतर ‘घर का लडका घर वापस आया है,’ अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली. मुकुल यांची घरवापसी झाली आहे. निवडणूक प्रचारादरम्यानही मुकुल रॉय विरोधात बोलले नाहीत. त्यांच्यासोबत कधीही मतभेद नव्हते, असे ममता म्हणाल्या. मुकुल रॉय यांना भाजपामध्ये धमक्या येत असत, ज्याचा त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला, असे ममतांनी सांगितले. तसेच रॉय यांची आता तृणमूलमध्ये असलेली भूमिका ममतांनी स्पष्ट केली. मुकुल रॉय यांनी यापूर्वी महत्वाची भूमिका साकारली आहे. भविष्यातही तीच भूमिका राहील. तृणमूल एक कुटुंब आहे, असे ममता म्हणाल्या.
भाजपाला धक्का...
काही दिवसांपूर्वी तृणमूलचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सौगत रॉय यांनीही मुकुल रॉय पक्षात दाखल होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. कोरोनाची लागण झालेल्या मुकुल रॉय आणि त्यांची पत्नी कृष्णा रॉय यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी फोनवरून विचारपूस केली होती. आता मुकुल रॉय यांचा पक्षबदलाचा निर्णय भाजपाला मात्र मोठा धक्कादायक ठरला आहे. मुकुल रॉय यांच्यामुळेच भाजपाला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये 18 जागा मिळवण्यात यश आले होते.
कधी केला होता भाजपामध्ये प्रवेश?
मुकुल रॉय यांनी सर्वात आधी टीएमसीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी 2017 मध्ये भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. सुवेंदू अधिकारी यांना ज्याप्रकारे मान सन्मान देण्यात आला. तसा भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर मुकुल रॉय यांना मिळालेले नाही. त्यामुळे ते भाजपावर नाराज होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर चर्चा देखील केली होती.
कोण आहेत मुकुल रॉय?
मुकुल रॉय तृणमूल काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांनी टीएमसी स्थापित करण्यासाठी मेहनत घेतली होती. युपीए सरकारच्या काळात त्यांनी केंद्रात मंत्रिपद सांभाळली. मात्र, 2015 मध्ये शारदा आणि नारदा घोटाळ्यात अडकल्यानंतर तृणमूलने त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर ते टीएमसीवर नाराज होते. अखेर 2017 मध्ये त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी देत भाजपाची वाट धरली होती. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी कृष्णानगर दक्षिणमध्ये विजय मिळवला आहे. मात्र, भाजपावर नाराज असल्याने आता पुन्हा त्यांनी घरवापसी केली.