गांधीनगर (गुजरात): बलात्कार प्रकरणी गांधीनगर सत्र न्यायालयाने आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासह पीडितेला 50 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. गुजरातच्या गांधीनगर येथील न्यायालयाने 2013 मध्ये एका माजी महिला अनुयायीने दाखल केलेल्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला दोषी ठरवले होते. न्यायालयाने मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. आपल्या निर्णयात न्यायालयाने आज आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आसाराम बापू जोधपूरच्या कारागृहात: विशेष सरकारी वकील आर.सी.कोडेकर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.के.सोनी यांनी शिक्षेवरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अंतिम निर्णय दुपारी 3.30 वाजेपर्यंत राखून ठेवला होता. तत्पूर्वी, फिर्यादी महिलेने मंगळवारी दावा केला की, आसाराम बापू हा सराईत गुन्हेगार आहे. आसारामला मोठा दंड ठोठावण्यासह जन्मठेपेची विनंती पीडितेने केली होती. आसाराम बापू (वय 81) सध्या जोधपूरच्या तुरुंगात आहे. जिथे तो 2013 मध्ये राजस्थानमधील त्याच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.
सरकारी वकील म्हणाले: कोडेकर यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'न्यायालयाने आसारामला ज्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवले आहे त्याची कमाल शिक्षा जन्मठेप किंवा 10 वर्षांची शिक्षा आहे. पण जोधपूरमधील अशाच आणखी एका प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात यावे, असा आमचा युक्तिवाद आहे. आसारामला गुन्हेगार मानून कठोर शिक्षा द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. कोडेकर यांनी सांगितले की, बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले आहे की, आसाराम बापूंना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यास मला हरकत नाही.
मूळ घटना २००१ सालची: बलात्काराची ही घटना सुरत मध्ये २००१ साली घडली आहे. त्यावेळी आसारामवर गुन्हा दाखल करण्याचे धाडस कोणी केले नाही. अखेर या घटनेच्या 12 वर्षांनंतर म्हणजेच 6 ऑक्टोबर 2013 रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्यात सरकारतर्फे 55 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांच्या परस्परविरोधी जबाबामुळे एकूण 8 पैकी एका आरोपीला साक्षीदार करण्यात आले. याशिवाय सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. तेव्हापासून हे प्रकरण गाजत होते. गांधीनगर सत्र न्यायालयाने 6 आरोपींना निर्दोष तर आसाराम याला दोषी ठरवले आहे. बलात्काराचा दोष सिद्ध झाल्यानंतर आसारमपुत्र नारायण साई यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
हेही वाचा: आसारामपुत्र नारायण साईला जन्मठेप त्या दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात न्याय