नवी दिल्ली : इथेनॉलचे मोठ्या स्तरावर उत्पादन घेतल्यास, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. कर्नाटकातील ३३ नव्या महामार्ग प्रकल्पांचे शनिवारी गडकरींच्या हस्ते व्हर्चुअल उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कर्नाटक हे देशातील प्रमुख उस उत्पादक राज्यांमध्ये गणले जाते. त्यामुळे याठिकाणी इथेनॉलचे मोठे प्रकल्प उभारणे सहज शक्य आहे, असेही ते म्हणाले.
"देशात मोठ्या प्रमाणात साखर आणि तांदळाचे उत्पादन घेतले जाते. सरकारकडे या दोन्ही गोष्टींचा मुबलक साठा आहे. त्यामुळे, जादाचे उत्पादन हे इथेनॉल बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते. इथेनॉलचा वापर वाहनांच्या इंधनात होतो. यामुळे केवळ शेतकऱ्यांचे उत्पादनच वाढणार नाही, तर आपल्या देशाला इंधनासाठी आत्मनिर्भर बनवण्याकडे हे महत्त्वाचे पाऊल असेल" असे गडकरी म्हणाले.
कर्नाटकात १० हजार कोटींचे प्रकल्प..
गडकरींनी शनिवारी कर्नाटकात ३३ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यामध्ये १,१९७ किलोमीटर लांबीचे मार्ग तयार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत १०,९०४ कोटी आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये कर्नाटकमध्ये ९०० किलोमीटर लांबीचे महामार्ग तयार करण्यात आले आहेत. यानंतर आता राज्यातील एकूण राष्ट्रीय महामार्गांची लांबी ७,६५२ किलोमीटर झाली असल्याचेही गडकरींनी सांगितले.
गोवा-केरळ मार्गाचे रुंदीकरण..
बंदरांचे एकमेकांना जोडले जाण्यामुळे व्यापाराला चालना मिळते. गोवा सीमा ते केरळ सीमा या किनारी मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून, बेलेकेरी, कारवार आणि मंगळुरू अशी शहरे यामुळे एकमेकांना जोडली जात आहेत. हा २७८ किलोमीटरचा प्रकल्प असून, याची किंमत ३,४४३ कोटी रुपये असल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.
हेही वाचा : ईटीव्ही भारत विशेष: '2020' सरकारच्या योजनांचा आणि आरोग्याबाबत निर्णयांचा आढावा