नवी दिल्ली - रेल्वे मंत्रालयाने स्टेशनवर देण्यात येणाऱ्या मोफत वायफाय सुविधेचा विस्तार केला आहे. त्यानुसार देशभरातील 6 हजार रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा देण्यात आली आहे. शनिवारी झारखंडच्या हजारीबाग टाऊनमध्ये वायफाय सेवा सुरू झाली. यानंतर मोफत वायफाय सुविधा सहा हजार रेल्वे स्थानकांवर पोहोचली आहे.
रेल्वेने 2016 मध्ये प्रथम मुंबई रेल्वे स्थानकात विनामूल्य वायफाय सेवा दिली होती. विनामूल्य वायफायचे 5000 वे स्थानक बंगालमधील मेदिनीपूर स्टेशन बनले होते. तर 15 मे ला ओडिशाच्या अंगुल जिल्ह्यातील जरापाडा स्थानकांना मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे रेल्वेने रविवारी सांगितले.
रेल्वे स्थानकांवरील वायफाय सुविधा भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाची उद्दीष्टे पूर्ण करत आहे. यामुळे ग्रामीण भागात डिजिटल पोहोचेल आणि लोकांना अनेक सुविधांचा लाभ मिळेल. ग्रामीण भागात आणि विरळ लोकसंख्या असलेल्या भागातील रेल्वे स्टेशनमध्ये इंटरनेट सेवा देण्यावर रेल्वे प्राधान्य देत आहे. इंटरनेटच्या मदतीने गाव आणि शहरातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
रेल्वे स्टेशन ही डिजिटल समावेशकतेचे माध्यम म्हणून पुढेही कार्यरत राहणार आहे. इंटरनेटमुळे आज अनेक गोष्टी सहज आणि सोप्या झाल्या आहेत. वाय-फाय प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
हेही वाचा - विना परवाना सार्वजनिक वायफाय बसविता येणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी