तिरुवअनंतपूरम - केरळ राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस मोफत मिळले, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी केली आहे. कोरोना लसीसाठी कोणालाही पैसे मोजावे लागणार नाहीत, ही सरकारची भूमिक असल्याचे कन्नूर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
तामिळनाडू, मध्यप्रदेश राज्याने याआधी मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता केरळने मोफत लस देणार असल्याचे जाहीर केले आहे. बिहारमध्ये सत्ता आल्यास कोरोनाची लस मोफत देऊ, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी निवडणुकीआधी केली होती.
आणीबाणीच्या काळात परवाना देण्यासाठी विचार सुरू
भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि फायझर कंपनीने तयार केलेल्या लसींना परवानगी देण्याचा विचार सरकार करत आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत लस वापरासाठी परवाना देण्यासाठी सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचेही सरकारने याआधी म्हटले आहे. लसींना परवानगी मिळाल्यानंतर भारतात लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू केली आहे.
पाच लसी विकासाच्या विविध टप्प्यांवर
पाच कोरोनाच्या लसी भारतात विकासाच्या विविध टप्प्यांवर असून त्यांच्या चाचण्या सुरू आहेत. केंद्र सरकारकडून राज्यांना किती लस मिळणार हे अद्याप निश्चित नसल्याचे विजयन यांनी सांगितले. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. मात्र, निवडणूक झाल्यानंतरच हे स्पष्ट होईल, असे विजयन यांनी म्हटले आहे.