कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यशवंत सिन्हा हे अटल सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. तर 2002 ते 2004 दरम्यान ते भारताचे परराष्ट्र मंत्री होते. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल.
देशातील जनता अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करत आहे. देशाची संस्थात्मक व्यवस्था खचली आहे. अटलजींच्या काळात भाजपाचा एकेतवर विश्वास होता. पण आजचे सरकार फोडाफोडीच्या राजकाणावर विश्वास ठेवते. अकाली, बीजेडी यांनी भाजप सोडला आहे. आज कोण भाजपाच्या पाठीशी उभा आहे?, असे ते म्हणाले.
राजकारणात प्रवेश -
यशवंत सिन्हा यांनी 1960 मध्ये भारतीय प्रशासनीय सेवेत (आय.ए.एस) रुजू झाले. 1984 पर्यंत ते सेवेत होते. त्यानंतर त्यांनी सेवेचा राजीनामा देऊन जनता पक्षात प्रवेश केला. 1986 मध्ये त्यांची जनता पक्षाचे सरचिटणिस म्हणून नियुक्ती झाली होती. तर 1988 मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी त्या पक्षात प्रवेश केला. तसेच त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. तर 1990 मध्ये जनता दलात फूट पडल्यानंतर त्यांनी चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलात प्रवेश केला. तेव्हा चंद्रशेखर यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला.
उपाध्यक्षपदाचा राजीनामा -
1993 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ते 195-96 या काळात बिहार विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 1998-99 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकींमध्ये त्यांनी झारखंड राज्यातील हजारीबाग लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघितले. जून 2009 मध्ये पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाला जबाबदार ठरवत पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता.
भाजपावर टीका -
भाजपामधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली होती. कोणाची किती इंच छाती हे अर्थव्यवस्थेचे नियम बघत नाही.' सरकारने अर्थव्यवस्थेचे सगळे नियम पायदळी तुडवल्यानेच देशात मंदीचे वातावरण निर्माण झल्याची टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली होती. लॉकडाऊनमध्ये स्थलांतरीत मजुरांना घरी पोहचवण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी, अशी मागणी करत त्यांनी दिल्लीतील राजघाटवर आंदोलन केले होते. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली होती.
हेही वाचा - रणधुमाळी ठरली! पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात मतदान