लखनऊ - शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एक नवे कुराण तयार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. नव्या कुराणची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवली आहे. देशातील मदरसे आणि मुस्लीम समाजाला नवे कुराण शिकवले जावे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.
पूर्वपासून मुस्लीम समाज जे कुराण वाचत आला आहे. ते वर्तमान परिस्थितीला धरून योग्य नाही. दुसऱ्या धर्मापेक्षा आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे, हे सांगणारे कुराण राष्ट्रहितासाठी योग्य नाही. त्यावर प्रतिबंध लावण्यात यावा. देशात इतर धर्मीय लोक राहतात. त्यामुळे याप्रकरणी भारतात पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे वसीम रिझवी यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तसेच आपलं नवे कुराण लवकरच बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी वसीम रिझवी यांनी कुराणमधील 26 आयत हटवण्याची याचिका सुप्रीम कोर्टात वादग्रस्त दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने 12 एप्रिलला ती याचिका फेटाळली होती. कुराणच्या 26 आयतामुळे (श्लोक) दहशतवादाला चालना मिळते. इस्लाम हा समानता, चांगुलपणा, क्षमा आणि सहनशीलता या संकल्पनेवर आधारित आहे. परंतु कुराणच्या 26 आयातामुळे धर्म मूलभूत तत्त्वांपासून दूर जात आहे, असा युक्तीवाद रिझवी यांनी आपल्या याचिकेत केला होता. कुराणावर आक्षेप घेतल्याप्रकरणी मुस्लीम समजातील नेत्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलने केली होती.
वसीम रिझवी यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशी -
वसीम रिझवी यांचे बसपा, सपाच्या नेत्यांशी अगदी जवळचे आणि खास नाते होते. राज्यात योगी सरकारची स्थापना झाल्यापासून वसीम रिझवी सातत्याने वादग्रस्त विधाने करत आहेत. कधी मदरसे तर कधी मौलानांवर भाष्य करून वसीम रिझवी बऱ्याचदा चर्चेत आले. वसीम रिझवी बसपा आणि सपा सरकारमध्ये शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष होते. योगी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्याच समाजातील लोकांनी आणि धार्मिक नेत्यांनी शिया वक्फची निंदानालस्ती आणि मालमत्तेची हेरफेर करण्याचे गंभीर आरोप केले. वसीम रिझवी यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशीही सुरू आहे.