पणजी - केंद्रात भाजपा अर्थात बिगरकाँग्रेस सरकार अस्तित्वात आले. यामुळे डॉ. राम मनोहर लोहिया यांचे एक मोठे स्वप्न साकार झाले, अशी प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाचे माजी राज्यसभा सदस्य के. सी. त्यागी यांनी आज पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
विशेष कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. राम मनोहर लोहिया यांचे गोवा मुक्ती संग्रामात मोठे योगदान आहे. गोवा यावर्षी मुक्तीचा हिरक महोत्सव साजरा करत आहे. त्याअंतर्गत आज डॉ. लोहिया यांच्या स्मृती दिनानिमित्त सरकारच्यावतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यागी गोव्यात आले होते. तसेच विधानसभेच्या पीएसी सभागृहात आयोजित कार्यक्रमाही ते उपस्थित होते.
'सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार'
डॉ. लोहिया यांचे विचार आज प्रासंगिक आहेत का, असे विचारले असता त्यागी म्हणाले, की केंद्रात बिगरकाँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन करणे डॉ. लोहिया यांचे स्वप्न होते. ते एक मोठे स्वप्न साकार झाले, असे दिसत आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा अर्थात बिगरकाँग्रेस सरकार कार्यरत आहे. त्यांनी समानता, समता आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार व्यक्त केला होता.
'निकालाची प्रतीक्षा'
पश्चिम बंगालमधील निवडणुकीविषयी बोलताना त्यागी म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीत हिंसा, आरोप-प्रत्यारोप असून कडवी झुंज आहे. त्यामुळे निकाल कसा लागतो याची प्रतीक्षा आहे, असे त्यागी म्हणाले. गोवा सरकारने आपल्याला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी दिल्याबद्दल सरकारचे आभार व्यक्त करताना ते म्हणाले, की गोवा मुक्ती संग्रामाचे 60 वर्ष साजरे करत आहोत. गोवा मुक्ती संग्रामात डॉ. राम मनोहर लोहिया यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी पोर्तुगाल सरकारविरोधात पहिल्यांदा सत्याग्रह केला. त्यांच्या स्मरणार्थ गोवा सरकारने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल आभारी आहोत. गोवा विकासाची जेव्हा चर्चा होईल, तेव्हा मनोहर पर्रीकर यांचे नाव निश्चित घेतले जाईल. दरम्यान, आपला पक्ष केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.