हैदराबाद : माजी खासदार संभाजीराजे यांनी काल हैदराबाद येथील प्रगती भवनात तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची भेट घेतली. महाराष्ट्रातही तेलंगणा पद्धतीने विकास व्हावा, अशी इच्छा संभाजीराजेंनी यावेळी व्यक्त केली आहे. त्यांनी आणि केसीआर यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि इतर मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच संभाजीराजे यांनी केसीआर यांना तेलंगणातील विकास आणि कल्याणकारी कार्यक्रमांबाबत विचारणा केली.
तेलंगणा मॉडेल महाराष्ट्रात लागू व्हावे : संभाजीराजे म्हणाले की, तेलंगणा विकास मॉडेल आणि तेलंगणाच्या कल्याणकारी योजना महाराष्ट्रातही लागू कराव्यात. ते म्हणाले की, तेलंगणाचे उत्कृष्ट प्रगतीचे मॉडेल महाराष्ट्रासह देशभरात पसरले पाहिजे. केसीआर आणि संभाजीराजे यांनी मत व्यक्त केले की, राष्ट्रीय अखंडता, विकास आणि देशातील लोकांचे कल्याण या उद्देशाने नाविन्यपूर्ण अजेंडा लोकांसमोर आणण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा समता आणि लोककल्याणाच्या मार्गाने दिलेला कारभार देशाच्या इतिहासात कायम राहील, असे मुख्यमंत्री केसीआर म्हणाले. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या भावनेने तेलंगणात जातीय-धार्मिक भेदभाव नाकारण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी संभाजीराजे यांच्या हस्ते मुख्यमंत्री केसीआर यांना राजर्षी शाहू छत्रपतींचे पुस्तक प्रदान करण्यात आले. या बैठकीत मंत्री वेमुला प्रशांत रेड्डी, मल्लार रेड्डी, आमदार कविता, मधुसूदनाचारी, पल्ला राजेश्वरा रेड्डी आणि इतर सहभागी झाले होते.
तेलंगणा मॉडेल काय : तेलंगाणामधील खम्मम येथे 18 जानेवारीला मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वात बीआरएसच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी बोलताना केसीआर यांनी देशात तेलंगणा मॉडेल लागू करण्यात येईल, अशी घोषणा केली. बीआरएस सत्तेत आल्यावर नागरिकांना मोफत वीज देण्यात येईल. शेतकऱ्यांना मुबलक पाणी आणि वीज पुरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या रॅलीत विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री एकवटले होते. यावेळी बोलताना केसीआर यांनी बीआरएस एलआयसीसाठी मोठा लढा उभारणार असल्याचे जाहीर केले. एलआयसीचे एजंट, कर्मचारी बीआरएसला भक्कम पाठिंबा देणार असल्याचे केसीआर यांनी यावेळी सांगितले. बीआरएस एलआयसीला मजबूत करणार असल्याचेही केसीआर यांनी यावेळी जाहीर केले.
हेही वाचा : BRS Rally In Khammam : सत्तेत आलो तर मोफत वीज देणार; अग्निपथ योजनाही गुंडाळणार - केसीआर