नवी दिल्ली - आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आसामचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली.
तरुण गोगोई हे 25 ऑक्टोबरला कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कोरोनावर मात केल्यानंतर 2 नोव्हेंबरला त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना जीएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोगोई यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करत नसल्यानं त्यांना श्वसनाला त्रास होत होता. तरुण गोगोई हे 2001 ते 2016 पर्यंत सलग तीन वेळा आसामचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
तरुण कुमार गोगोई यांनी आपल्या कार्यकाळात राज्यात बंडखोरी रोखण्यात यश मिळवले. आसाममधील 85 लाखाहून अधिक लोकांना आपल्या कार्यकाळात रोजगार मिळाल्याचा दावाही त्यांनी केला होता. तरुण गोगोई यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1936 रोजी आसाममधील जोरहाट जिल्ह्यातील टी-इस्टेट येथे झाला. गोगोई यांच्या वडिलांचे नाव कमलेश्वर गोगोई होते.
तरुण गोगोई यांनी जोरहाट येथील शासकीय शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि जे.बी. महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर, गोगोई यांनी गौहाटी विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले. ते विद्यार्थी नेते होते. गोगाई यांनी जोरहाट कॉलेज असोसिएशनचे सहसचिव म्हणून काम पाहिले. तसेच विद्यार्थी संघटनेचे जनरल देखील होते.
तरुण गोगोई यांची 1991 मध्ये कालीबोरमधून लोकसभेवर निवडूण गेले. 1999 ते 2000 या काळात रेल्वे विभागात लोकसभा समितीचे सदस्य होते. गोगोई यांनी सप्टेंबर 2001 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला. यानंतर ते विधानसभेचे नेते म्हणून निवडले गेले. त्यानंतर ते आसामचे मुख्यमंत्री झाले. 2006 मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसकडून निवडणूक जिंकली आणि सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2011 मध्ये झालेल्या निवडणुका जिंकल्यानंतर त्यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली.