लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्व हौशे, नवशे आणि गवशे सर्वच याच्या तयारीला लागले आहेत. मात्र यामध्ये आरक्षित जागांचा मोठा अडथळा येतो आहे. ठराविक ठिकाणांवर उमेदवारांच्या विरुद्ध पक्षातील जागांसाठी आरक्षण लागले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी सरळ मार्गाने शिरता येत नाही, त्याठिकाणी कोणत्या मार्गाने खुर्ची मिळवता येईल यासाठी सर्व उमेदवार प्रयत्न करत आहेत.
लोकांच्या भल्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी निर्णय..
बलिया जिल्ह्यातील असेच एक प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हाथी सिंह (४५) हे आपल्या गावातील सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र, त्यांच्या गावातील जागा महिला उमेदवारासाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांची चांगलीच पंचायत झाली. मग त्यांनी गावातील लोकांच्या भल्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी एक मोठा निर्णय घेतला. आजन्म ब्रह्मचारी राहण्याची आपली भीष्मप्रतिज्ञा तोडत, त्यांनी छपरा जिल्ह्यातील निधी कुमारी या तरुणीशी लग्न केले. विशेष म्हणजे ज्या महिन्यात शुभकार्य करत नाहीत, असा खरमास सुरू असूनही त्यांनी आपला निर्णय अंमलात आणला.
आता दोघे मिळून करणार गावचा विकास..
सध्या या दोघांच्या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हाथी सिंह आपल्या निर्णयाविषयी म्हणतात, की गावाचा विकास आणि राष्ट्रसेवेपेक्षा मोठं काहीच नसतं. त्यामुळेच मी माझी प्रतिज्ञा मोडून लग्न करायचा निर्णय घेतला. आता माझी पत्नी उमेदवारी अर्ज भरु शकते, ज्यामुळे मीदेखील गावच्या विकासात हातभार लाऊ शकतो.
हेही वाचा : भगवान शंकराचे 'हे' प्रिय पेय आहे उन्हाळ्यात आरोग्यासाठी पौष्टिक; मिळतील अनेक फायदे