बंगळुरू - बेंगळुरूच्या कोरामंगळा येथे तरुणीची छेडछाड करणाऱ्या मुलाला पोलिसांनी 48 तासांत पकडले. पीडित तरुणीने पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली आणि कोरामंगळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण कुमार आणि त्याचा भाऊ बेंगळुरू येथे मुख्यालय असलेल्या अन्न वितरण फर्मचे कर्मचारी आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनेक खाद्यपदार्थांच्या डिलीव्हरीज पोहोचवायच्या होत्या, त्यामुळे आरोपीचा भाऊ सकाळी, तर अरुण रात्री खाद्यपदार्थांची डिलीव्हरी करत असे. ३१ मे रोजी रात्री आरोपी कोरमंगळा येथे खाद्यपदार्थांची डिलीव्हरी करण्यासाठी गेला असता, त्याने एका उत्तर भारतीय तरुणीला छेडले. झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.
असा घेतला आरोपीचा शोध
माडीवाला येथील एसीपी सुधीर हेगडे यांच्या सूचनेनुसार पीएसआय पुट्टास्वामी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 40 सीसीटीव्ही आणि 80 दुचाकी गाड्यांचा शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी स्कुटर वापरत असल्याचे समोर आले. फूड डिलीव्हरी एजन्सीशी संपर्क साधल्यावर त्या परिसरात ८० दुचाकींनी खाद्यपदार्थ डिलीव्हरी केल्याचे तपासणीत आढळून आले. पुढील तपासात ही बाईक आरोपीच्या भावाची असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीच्या भावाला ताब्यात घेतले. दुचाकी आपला भाऊ वापरत असल्याचे आरोपीच्या भावाने चौकशीदरम्यान कबूल केले. व्हिडिओ फूटेज आणि पुराव्याच्या आधारे आरोपीला ४८ तासांत पकडण्यात पोलिसांना यश आले. गेल्या एका महिन्यात आरोपीने हेच कृत्य ३ त ४ मुलींसोबत केल्याचे कबूल केले. मुलींची छेड काढल्याने मानसिक समाधान मिळत असल्याचेही त्याने सांगितले.
हेही वाचा - लॉकडाऊनमुळे हाताचे काम गेल्याने आली चोरीची वेळ; २ महिन्यात १८ सायकली चोरणाऱ्याला अटक