नवी दिल्ली/ नोएडा : ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्स्प्रेसवेवर ( Yamuna Expressway ) बोलेरो आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 2 जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच जेवर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चारधाम यात्रेसाठी निघालेल्या यात्रेकरूंच्या बोलेरो गाडीला नोएडा नजीक झालेल्या अपघातात बारामतीतील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. या गाडीतून सात जण प्रवास करीत होते. त्या पैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून अपघातग्रस्त गाडीचा चालक गंभीर जखमी आहे. गाडीमधील आणखी दोन महिला गंभीर जखमी झाले आहेत.
चारधाम यात्रेसाठी जाताना अपघात
चारधाम यात्रेसाठी एकूण पन्नास लोक महाराष्ट्रातून निघाले होते. काल रात्री वृंदावनला मुक्काम केला. आज पहाटे साडेचार वाजता ते दिल्लीकडे जाण्यासाठी निघाले होते. नोएडा नजीक जेवर या गावाजवळ डंपरला बोलेरो गाडीने मागून जोरदार धडक दिली. यामध्ये बारामतीतील चंद्रकांत नारायण बोराडे, सुवर्णा चंद्रकांत बोराडे हे दांपत्य, रंजना भरत पवार व मालन विश्वनाथ कुंभार, नुवंजन मुजावर (53 वर्ष) या चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे पुण्यातील बारामतीचे रहिवासी आहेत. तर नारायण रामचंद्र कोलेकर (40) वर्ष आणि सुनीता राजू गस्टे (35) हे जखमी आहेत.
आरोपीवर कायदेशीर कारवाई
अतिरिक्त डीसीपी ग्रेटर नोएडा विशाल पांडे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आणि सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. येथे 5 जणांचा मृत्यू झाला. तर 2 जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकांचा समावेश आहे. दोन्ही वाहने महामार्गावरून बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष
या गाडीचा चालक नारायण कोळेकर गंभीर जखमी झाला असून त्याला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. नोएडामधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याव्यतिरिक्त निपाणी येथील मुजावर कुटुंबातील दोन महिलादेखील या अपघातात जखमी झाल्या आहेत. आज पहाटे साडेपाचच्या दरम्यान हा गंभीर अपघात झाल्याची माहिती आहे.दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अपघाताची दखल घेतली असून दिल्लीमध्ये यंत्रणेला मदतीचे आदेश त्यांनी स्वतः दिले आहेत. स्वतः अजित पवार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा - Damage Mango Crop In MP: उष्णतेचा तडाखा! कडाक्याच्या उन्हाने आंबा पिकाचे नुकसान