अमरावती : आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली. रुईया रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असणारा ऑक्सिजन संपल्यामुळे ११ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. रुग्णालयामध्ये अतिरिक्त ऑक्सिजन उपलब्ध होता. मात्र, सिलिंडर बदलण्यासाठी अवघा पाच मिनिटांचा उशीर झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. हे सर्व कोरोनाचे रुग्ण होते.
चित्तूर जिल्हाधिकारी एम. हरी नारायण यांनी याबाबत माहिती दिली. पाच मिनिटांमध्येच ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. मात्र, ही पाच मिनिटेच ११ रुग्णांसाठी घातक ठरली. ऑक्सिजन पुरवठा सुरू झाल्यामुळे इतर रुग्णांचे प्राण वाचू शकले, असे ते म्हणाले.
आयसीयूमध्ये ७०० रुग्णांवर सुरुयेत उपचार..
या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सुमारे ७०० कोरोना रुग्णांवर उपचार होते. रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्यानंतर अतिदक्षता विभागातील रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी सुमारे ३० डॉक्टर पोहोचले होते. रुग्णालयामध्ये पुरेसा ऑक्सिजन साठाही होता. मात्र, सिलिंडर बदलण्यामध्ये वेळ लागला. रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागाव्यतिरिक्तही ३०० कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आंध्रचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन चौकशीचे आदेशही दिले आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी खबरदारी बाळगण्याचा इशाराही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
हेही वाचा : युट्यूब अभिनेता राहुल वोहरा शेवटचा व्हिडिओ; कोरोनाने झाले होते निधन