नवी दिल्ली - मच्छीमार समुदायासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधींनी गुरुवारी ट्विट करून हा मुद्दा उपस्थित केला. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पुद्दुचेरीचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी मच्छिमारांसमोर बोलताना केंद्रात कृषी मंत्रालय आहे. तर मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय का नाही, असा सवाल उपस्थित केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून राहुल गांधींनी टि्वट केले. 'प्रिय पंतप्रधान, कोणत्याही मंत्रालयांतर्गत केवळ एक विभाग नाही. तर मत्स्यपालनासाठी मच्छीमार समुदायाला स्वतंत्र आणि समर्पित मंत्रालयाची आवश्यकता आहे, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे. यापूर्वीही राहुल गांधींनी मच्छिमारांसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केली होती.
राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालयाचा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेस केंद्रात सरकार स्थापन केल्यास मच्छीमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करेल, असं तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते. केरळच्या त्रिशूरमध्ये राष्ट्रीय मच्छीमार संसदेत त्यांनी हे विधान केलं होतं. राहुल गांधी केरळ दौऱ्यावर असुन काल त्यांनी कोलाम जिल्ह्याला भेट दिली. या भेटीत त्यांनी स्थानिक मच्छिमारांसोबत समुद्रात पोहण्याचा आनंद घेतला. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.