कानपूर : शहरातील अन्वरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बांसमंडी येथील कापड मार्केटमध्ये गुरुवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. सुमारे 500 दुकाने आगीच्या विळख्यात आली. या आगीमुळे व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कपडे व इतर सामान पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. ईदमुळे दुकानात चांगला माल ठेवल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
व्यापाऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक : गुरुवारी एआर टॉवरला लागलेली आग काही वेळातच इतकी भीषण बनली की त्याच्या ज्वाळा नफीस टॉवर आणि हमराज कॉम्प्लेक्सपर्यंत पोहोचली. रात्री उशिरा एक वाजता तीनही टॉवरसह शहरातील पाचशेहून अधिक दुकाने पेटू लागली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अचानक आलेल्या वादळामुळे अडचणी वाढल्या. त्यामुळे आग आणखी भडकली. आग आटोक्यात आणता आणता अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आली. आयुक्त बी.पी.जोगदंड यांनी तत्काळ अन्य जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या. मात्र, तोपर्यंत व्यापाऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला होता.
शॉर्ट सर्किटमुळे आग : उत्तर प्रदेश गारमेंट्स मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे प्रादेशिक सरचिटणीस गुरजिंदर सिंग यांनी सांगितले की, रात्री पावणे एकच्या सुमारास एआर टॉवरच्या बाहेर ठेवलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून शॉर्ट सर्किट झाले. लगेच शेजारी बसलेल्या नफीस टॉवरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयात सांगितले. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आग एआर टॉवरमधील 100 हून अधिक दुकानांमध्ये पसरली होती. यानंतर आग वाढतच गेली आणि दुकाने जळत राहिली. दुकानात कपडे, पुठ्ठ्याचे खोके, कागद, पेट्या बांधण्यासाठीच्या दोऱ्या ठेवल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
हेही वाचा : Kerala Crime News : परप्रांतीय कामगारांमध्ये संघर्ष, केरळमध्ये सहा वर्षांच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या