बंगळुरू - पोलिसांनी दलित युवकाला मारहाण करून मूत्र पाजल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. कर्नाटकाच्या चिक्कामगलुरुमध्ये हा किळसवाणा प्रकार घडला आहे. पीडित तरुणानं या प्रकरणाची तक्रार राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण सूद यांना पत्र लिहित केली आहे. तसेच मूत्र पिण्यास सांगणाऱ्या संबंधित पोलीस उपनिरीक्षक अर्जुनविरोधात एफआयआर दाखल केली आहे.
दलित तरुणावर आरोप आहे की, तो एका महिलेला फोनवर बोलायचा. ग्रामस्थांनी केलेल्या तोंडी तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्याला १० मे रोजी ताब्यात घेतले होते. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, "मला पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि मारहाण केली. माझे हात पाय बांधले होते. मी पाणी मागितले असता मला मूत्र चाटण्यास सांगितले. सुटका हवी असेल तर मूत्र चाटावे लागेल, असे पोलिसांनी मला सांगितले. पर्याय नसल्याने मलाही तसे करावे लागले. तसेच पोलीस ठाण्यात मला मारहाण करताना पोलिसांनी माझ्या दलित समाजालाही शिवीगाळ केली, असा आरोप पीडित तरुणाने केला आहे.
दलित संघटनांनी संबंधित पीएसआयविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. पोलीस अधीक्षक अक्षय यांनी डीवायएसपी प्रभू यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. तर संबधित पोलीस उपनिरक्षकाची सध्या दुसऱ्या ठाण्यात बदली झाली आहे.
दिनेश गुंडू राव यांचे टि्वट -
ही अमानवी व अपमानास्पद वागणूक आहे. अशा घटना समाजात घडू नयेत. सरकारने या घटनेचा गांभीर्याने विचार करून चौकशी केली पाहिजे. पीएसआयवर कारवाई करावी व्हावी, असे टि्वट एआयसीसीचे तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केले आहे.