कोरबा (छत्तीसगड) : सरकारकडून आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिकांच्या नावाखाली वेळोवेळी मोठे दावे केले जातात. मात्र या दाव्यात किती तथ्य असतं, हा संशोधनाचा विषय आहे. नुकतीच छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली. येथे एका वडिलांनी आपल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळून दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये नेला.
काय आहे प्रकरण : कोरबा जिल्ह्यातल्या अडसेना गावातील ही घटना आहे. येथं राहणारे दरस राम यादव आपल्या पत्नी आणि मुलासह शेती करून जीवन चालवितात. सध्या सुगीचा काळ असल्यानं दरस यांची पत्नी आपल्या दीड वर्षाच्या मुलासह शेतात गेली होती. दरम्यान, हा मुलगा खेळता-खेळता शेताजवळच्या एका तलावात पडला. आईला काही कळेपर्यंत तो तलावात बुडाला होता. तिथं उपस्थित लोकांनी तलावात मुलाचा शोध सुरू केला. हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यानंतर नातेवाइकांनी धावत-पळत लेमरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं. तिथं डॉक्टरांनी मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तसंच त्यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याचा सल्ला दिला.
- रुग्णालयात रुग्णवाहिका नव्हती : अडसेना गाव जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर आहे. मुलाचे वडील दरस राम यादव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यास सांगितलं. मात्र त्यांना येथे रुग्णवाहिका नसल्याचं उत्तर मिळालं. डॉक्टरांनी त्यांना स्वत:ची व्यवस्था करून मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. एकीकडे दीड वर्षाच्या मुलाचा मृतदेह, तर दुसरीकडे त्याचं शवविच्छेदन करण्यासाठी दबाव होता. असहाय्य बाप काय करणार? त्यानंतर त्यांनी मुलाचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळला. मित्रासोबत दुचाकीवरून मृतदेह नेण्यासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना झाले.
हे माझं मूल आहे. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी शवविच्छेदन करायला सांगितलं. मात्र तेथे रुग्णवाहिका नाही. माझ्याकडे वेळ कमी होता. म्हणून मी मुलाचा मृतदेह बाईकवरून आणला. - दरस राम यादव, मृत मुलाचे वडील
- चौकशीनंतर कारवाई करणार : मुलाचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याचं हे प्रकरण वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं. 'कोणत्या परिस्थितीत मुलाचा मृतदेह दुचाकीवरून आणावा लागला, याची चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाईल', असं अधिकारी म्हणाले.
हेही वाचा :