रांची : झारखंडच्या रांचीमध्ये काढण्यात आलेली एका मुलीची मिरवणूक सध्या खूप चर्चेचा विषय आहे. ही मिरवणूक मुलीला सासरी निरोप देण्यासाठी नव्हती, तर तिला सासरच्या छळातून मुक्त करण्यासाठी काढण्यात आली होती. सासरच्या लोकांकडून शोषण आणि छळ होत असलेल्या आपल्या विवाहित मुलीला परत आणण्यासाठी वडिलांनी बॅंड-बाजा आणि फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक काढली. (Father brought back daughter with band fireworks)
मिरवणुकीचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला : १५ ऑक्टोबर रोजी काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचा व्हिडिओ वडिलांनी सोमवारी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला. त्यांनी लिहिलं की, 'लोकं आपल्या मुलींचं लग्न मोठ्या थाटामाटात करतात. मात्र जर तिचा जोडीदार आणि कुटुंब तिच्यासोबत चुकीचा व्यवहार करत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलीला सन्मानानं घरी परत आणावं, कारण मुली खूप मौल्यवान असतात'.
नवरा छळ करायचा : प्रेम गुप्ता असं या धाडसी वडिलांचं नाव असून ते रांची येथील कैलाश नगरचे रहिवासी आहेत. त्यांनी २८ एप्रिल २०२२ रोजी आपली मुलगी साक्षी गुप्ता हिचं सचिन कुमार नावाच्या तरुणाशी मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं होतं. हा तरुण झारखंड वीज वितरण महामंडळात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. वडिलांनी आरोप केला आहे की, काही दिवसांनी मुलीचा सासरी छळ होऊ लागला होता. तिचा नवरा तिला वारंवार घराबाहेर काढायचा. तब्बल एका वर्षानंतर साक्षीला कळालं की, तिचं ज्या व्यक्तीसोबत लग्न झालं आहे, त्याचं या आधी दोनदा लग्न झालं होतं. त्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
मिरवणूक काढून माहेरी आणलं : साक्षी सांगते की, सर्व काही कळाल्यानंतरही तिनं हिंमत हारली नाही. तिनं तिचं नातं कसं तरी वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र सततच्या शोषण आणि छळामुळं पतीसोबत राहणं कठीण आहे असं लक्षात आल्यानंतर तिनं या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. साक्षीच्या कुटुंबीयांनीही तिच्या या निर्णयाचं समर्थन केलं. त्यानंतर त्यांनी तिला सासरहून बँड आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढून माहेरी आणलं.
घटस्फोटासाठी कोर्टात केस दाखल केली : आपली मुलगी छळातून मुक्त झाल्याच्या आनंदात हे पाऊल उचलल्याचं प्रेम गुप्ता सांगतात. साक्षीनं आता घटस्फोटासाठी कोर्टात केस दाखल केली असून, या घटस्फोटाला लवकरच कायदेशीर मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :