उधमपूर/जम्मू : जम्मू - काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे (एनसी) अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी गुरुवारी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले की, हा पक्ष केवळ सत्तेत राहण्यासाठी रामाचे नाव वापरतो. पण राम फक्त हिंदूंचा देव नाही.
'राम फक्त हिंदूंचा देव नाही' : उधमपूरमध्ये पँथर्स पार्टीने आयोजित केलेल्या रॅलीत अब्दुल्ला म्हणाले, 'राम हा फक्त हिंदूंचा देव नाही. कृपया हा समज तुमच्या मनातून काढून टाका. भगवान राम सर्वांचे प्रभु आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवणारे सर्व धर्मीय आहेत, मग ते मुस्लिम असोत वा ख्रिश्चन, अमेरिकन असोत किंवा रशियन. फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले की, 'आम्ही फक्त रामभक्त आहोत, असे म्हणणारे तुमच्याकडे येतात. ते मूर्ख आहेत. त्यांना रामनामाचा फायदा घ्यायचा आहे. त्यांना सत्ता प्रिय आहे, राम नाही. ते म्हणाले, 'मला वाटतं जम्मू - काश्मीरमध्ये निवडणुका जाहीर होतील, तेव्हा सामान्यांचे लक्ष वळवण्यासाठी ते राम मंदिराचं उद्घाटन करतील'.
ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले : बिगर - भाजप पक्षांमधील एकतेच्या मुद्द्यावर अब्दुल्ला म्हणाले, 'आमच्या ऐक्यात कोणताही अडथळा येणार नाही. मग ते काँग्रेस असो, नॅशनल कॉन्फरन्स किंवा पँथर्स पार्टी. आम्ही लोकांसाठी लढू आणि मरू देखील, पण आम्ही सर्व एक होऊ. अब्दुल्ला यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर (ईव्हीएम) प्रश्न उपस्थित केले आणि लोकांना त्याच्या वापराबाबत सावध राहण्यास सांगितले. केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीपूर्वी धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांविरुद्धही त्यांनी लोकांना सावध केले आहे.
ईव्हीएमवरून विरोधी पक्षांची बैठक : काल राजधानी दिल्लीत विरोधी पक्षांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पवारांनी बोलावलेल्या बैठकीत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल, काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह, सपा नेते प्रफुल्ल पटेल, समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव, सीपीआय नेते डी राजा, बीआरएस नेते केशव राव, सीपीआयएम नेते इलाराम करीम यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.
हेही वाचा : Sharad Pawar On EVM : ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यास मत नेहमीच भाजपला जाते, विरोधकांनी 'हे' उपस्थित केले प्रश्न