नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेले शेतकरी आज (शनिवार) दिवसभर उपोषण करणार आहेत. ३० जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असून त्यांना आदरांजली म्हणून शेतकरी नेत्यांकडून 'सद्भावना दिवस' पाळण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर दिल्लीलील आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आणखी धार आली असून हजारोंच्या संख्येने शेतकरी दिल्लीकडे रवाना होत आहेत.
दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत मागील ६५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दोन महिने शांततेत चाललेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी गालबोट लागले. ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार झाल्यानंतर दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवरील गाझीपूर येथील आंदोलनकर्त्यांनी घराची वाट धरली होती. मात्र, शुक्रवारपासून शेतकरी पुन्हा सीमेवर येऊ लागले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशामुळे आंदोलनस्थळी गर्दीने वाढली -
आंदोलन स्थळे खाली करण्याचे आदेश उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. गुरूवारी (२८ जानेवारी) रात्री गाझीपूर आंदोलनस्थळ खाली करण्याबाबत पोलिसांनी शेतकऱ्यांना 'अल्टिमेटम' दिला. आंदोलन मागे घेणार नाही आणि घरीही जाणार नाही. सरकारने आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या, तरीही आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले. त्यांच्या या भावनिक आवाहनाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. ट्रॅक्टर, ट्रक घेवून हजारो शेतकरी गाझीपूर सीमेवर दाखल होत आहेत.
सिंघू आणि टिकरी सीमेवर काही नागरिकांनी स्थानिक रहिवासी असल्याचा दावा करत आंदोलकांना तेथून निघून जाण्यास सांगितले. यावेळी आंदोलक, पोलीस आणि स्थानिक नागरिकांत झटापट झाली. पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. मात्र, आमच्या विरोधात आंदोलन करणारे नागरिक स्थानिक नसून भाजपाचे हे टोळके आहे, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.