चंदिगढ : पंजाबच्या मुक्तसरमध्ये भाजपा आमदार अरुण नारंग यांच्या मारहाणीप्रकरणी काही शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि याप्रकरणाची पुरावानिहाय चौकशी करण्यात यावी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. पंजाब पोलिसांनी याप्रकरणी निःपक्षपाती चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे.
काय आहे प्रकरण?
अबोहरमधील आमदार अरुण नारंग हे काही स्थानिक नेत्यांसोबत राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी (२७ मार्च) मलोट येथे आले होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच. त्यांच्याच येण्याची वाट पाहत असलेल्या संतापलेल्या शेतकऱ्यांच्या जमावाने त्यांना घेरले. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर शाई फेकली. तसेच त्यांच्या कारलाही काळं फासलं होतं.
या घटनेनंतर पोलिसांनी आमदार अरुण यांना एका दुकानात थांबवले. मात्र, जेव्हा ते बाहेर आले तेव्हा पुन्हा शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. नारंग यांना मारहाण केली आणि कपडेही फाडले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात पोलीस एका व्यक्तीचं शेतकऱ्यांपासून बचाव करताना दिसत आहेत. आंदोलक हे भाजपाच्या आमदारांना गावात पत्रकार परिषद घेऊ देणार नसल्याचे पोलीस उपअधीक्षक जसपाल सिंग यांनी सांगितले. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवलं होतं.
या घटनेमध्ये एक पोलीस अधीक्षकही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, याप्रकरणी काही शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा : पंजाब : आंदोलक शेतकऱ्यांनी भाजपा आमदाराचे कपडे फाडत काळेही फासले