सिरसा(हरियाणा) : हरियाणातील शेतकऱ्यांकडून सातत्याने भाजप नेत्यांना विरोध केला जात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शेतकरी आक्रमक झाल्याचे चित्रही बघायला मिळाले. हरियाणा विधानसभेचे उपसभापती रणबीर गंगवा यांनाही रविवारी शेतकऱ्यांचा रोषाचा सामना करावा लागला. गंगवा एका कार्यक्रमातून परतत असताना संतप्त शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनांचा ताफा अडवून दगडफेक केली.
रणबीर गंगवा रविवारी सिरसा येथील चौधरी देवी लाल विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर परतत असताना रामायण टोल प्लाझाजवळ शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीचे काचही फोडले आणि पोलिसांवरही दगडफेक केली. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी कसाबसा गंगवा यांचा ताफा तेथून पुढे काढून दिला. यावेळी शेतकऱ्यांनी विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.
दरम्यान, या घटनेच्या काही वेळ आधी विद्यापीठातच शेतकऱ्यांनी सिरसाच्या खासदार सुनीता दुग्गल आणि जिल्हाध्यक्ष आदित्य देवी लाल यांचाही विरोध केला. काही शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि ते विद्यापीठात शिरले. मात्र तेथे उपस्थित पोलिसांनी लागलीच त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे हरियाणात भाजप नेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत असल्याचेच चित्र बघायला मिळत आहे.
हेही वाचा - उत्तर प्रदेश : एटीएसने दोन दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात; सर्च ऑपरेशन सुरू