नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांच्या वतीने दिल्लीवर मोर्चा काढणार आहेत. हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी हरियाणामधील राजीव गांधी एज्युकेशन सिटीमध्ये एकत्र येणार आहेत. त्यानंतर हे सर्व एकत्रितपणे दिल्लीकडे कूच करतील. या पार्श्वभूमीवर राजीव गांधी एज्युकेशन सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी संघटना आज आणि उद्या दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणार आहेत. यासाठी ‘दिल्ली चलो’चं आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हरियाणा सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना रोखून धरण्यासाठी रस्ते बंद केले आहेत.
या आंदोलनास विरोध म्हणून हरियाणा सरकारने पंजाब सीमा बंद केल्या आहेत. हरियाणाचे परिवाहन मंत्री मूलचंद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन राज्यांदरम्यानची बससेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम लक्षात घेता, एवढ्या मोठ्या जनसमुदायाला आम्ही पुढे जाऊ शकत नाही.
हरियाणाच्या अंबालामध्ये आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला. शेतकऱ्यांना दिल्लीस जाण्यापासून पोलीस अडवत आहेत. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आहेत.
पंजाब आणि हरियाणा मुख्यमंत्र्यामंध्ये आरोप-प्रत्यारोप-
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी होऊन दिल्लीकडे कूच करण्यापासून रोखल्या प्रकरणी हरियाणा सरकारचा निषेध केला आहे. मनोहर लाल खट्टर यांची सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाला का रोखता असा सवाल सवाल मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी केला आहे.
यावर "कॅप्टन अमरिंदर सिंह, मी हे पुन्हा सांगत आहे, एमएसपीबाबत भविष्यात काही काही अडचण आल्यास मी राजकारण सोडतो. मात्र, तुम्ही निरपराध शेतककऱ्यांना भडकावण्याचे काम थांबवा. मी गेल्या तीन दिवसांपासून आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. पण दुर्दैवाने आपण संपर्काबाहेर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्रत्युत्तर हरियाणाचे मुख्यमंत्री एम.एल. खट्टर यांनी दिले आहे.,
तुमच्या खोट्या प्रचार आणि फसवणुकीची वेळ आता संपली आहे. कृपया कोरोना सारख्या महामारीत लोकांच्या जीवाशी खेळ खेळणे बंद करा, मी तुम्हाला विनंती करतो. किमान अशा महामारीच्या काळात तरी राजकारण करू नका, अशी टीका मुख्यमंत्री खट्टर यांनी केली आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा आरोप आहे, की आम्ही शेतकऱ्यांना आंदोलनासाठी भडकवण्याचे काम केले. मात्र, हे साफ चुकीचे असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी व्यक्त केले आहे. हरियाणातील शेतकरी आंदोलन करत मग त्यांना मी भडकवत आहे का? आज पंजाबमध्ये होत आहे. उद्या हरियाणामध्ये होईल. हे शेतकऱ्यांनी स्वयंप्रेरणेतून केले आंदोलन आहे. त्यांचा कृषी कायद्याविरोधात राग या आंदोलनातून व्यक्त होत असल्याचे मत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी व्यक्त केले.
आंदोलन करू नका 3 डिसेंबरला चर्चा करू'- कृषीमंत्री तोमर
पंजाब, हरियाणामधील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत.यातच केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये. 3 डिसेंबरला त्यांच्याशी चर्चा केली जाईल, असं तोमर यांनी म्हटलं.
सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहे. चर्चेच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. शेतकऱ्यांनी आंदोलन थांबवावे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. सरकार त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे. यापूर्वीही कृषी कायद्यावरून शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. मात्र, अनेक कारणांनी चर्चा अयशस्वी झाली. येत्या 3 डिसेंबरला शेतकऱ्यांनी चर्चा करण्यासाठी यावे, असे ते म्हणाले.
कामगार आणि शेतकरी कायद्या विरोधात महाराष्ट्रातही आंदोलने-
केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांशी कोणतीही चर्चा न करता शेतकरी व कामगार विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे शेतकरी, कामगार, ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे, असे म्हणत या विरोधात आज 26 संविधान दिनी देशातील सर्व शेतकरी व कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. पुणे शहरातही अनेक संस्था-संघटनांच्यावतीने बंद पुकारण्यात आला असून विविध शेतकरी व कामगार संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुरक्षा हक्क रॅलीचे आयोजन केले होते.