बदायूं Badaun Eyes Theft Case : उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात मृतदेहाच्या डोळे काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मुझरिया पोलीस स्टेशन हद्दीतील रसुला गावात महिलेचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला. महिलेच्या माहेरकडीन आरोप आहे की, हुंड्याच्या लालसेपोटी सासरच्यांनी तिची हत्या केली. त्यानंतर त्यांनी घरातून पळ काढला. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र शवविच्छेदनानंतर जेव्हा महिलेच्या कुटुंबीयांनी मृतदेह घरी आणला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मृतदेहाचे दोन्ही डोळे गायब होते. यानंतर कुटुंबीयांनी या घटनेची लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
हुंड्यासाठी महिलेची हत्या : मुझरिया पोलीस स्टेशन हद्दीतील रसुला गावात राहणाऱ्या एका महिलेची हत्या करण्यात आली. महिलेच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळताच ते तिच्या सासरी पोहोचले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार महिलेचं नऊ महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. पण लग्नाच्या काही दिवसांतच सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यासाठीच तिची हत्या करण्यात आल्याचा दावाही महिलेच्या कुटुंबीयांनी केलाय.
शवविच्छेदनापूर्वी महिलेच्या मृतदेहाचे डोळे होते : हत्येनंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून मृतदेह 10 डिसेंबर रोजी पोस्टमार्टमसाठी पाठवला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला तेव्हा तिचे डोळे दिसत होते. मात्र, शवविच्छेदनानंतर मृतदेह घरी आणण्यात आला डोळे काढण्यात आल्याचं आढळलं. दरम्यान, हा गुन्हा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी केलीय.
तपास सुरू : याप्रकरणी बोलत असताना मृत महिलेचे काका कालीचरण म्हणाले की, त्यांनी अद्याप मृतदेहावर अंत्यसंस्कार केलेले नाहीत. मृतदेहाला डोळे नसल्याचं पाहून ते लगेच बदायूंला आले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी मनोज कुमार यांच्याकडं केली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एसएसपी डॉ. ओपी सिंह यांनी सांगितलं.
हेही वाचा -