नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीनंतर 11 राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला विजय प्राप्त झाला आहे. या यशानंतर भाजपाने 2024मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. यासाठी भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी 120 दिवसांचा मास्टर प्लान केला आहे. या 120 दिवसांमध्ये नड्डा संपूर्ण देशाचा दौरा करणार आहेत. यामध्ये भाजपा नेत्यांच्या बैठका ते घेणार असून लोकसभा निवडणुकीत ज्या जागांवर भाजपाचा पराभव झाला त्या जागांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत.
भाजपाचा हा दौरा अत्यंत नियोजनबद्ध राहणार आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी नड्डा स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. 2019 लोकसभा निवडणुकामध्ये गमावलेल्या जागांवर तसेच भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर त्यांचा फोकस राहाणार आहे. तसेच 2024च्या निवडणुकांमध्ये या जागा कशा काबिज करता येतील, यावर भाजपाची रणनीती असणार आहे.
राज्यातील जिल्हाप्रमुख, संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट -
नड्डा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर जाणार असून उत्तराखंड हे दौऱ्यातील पहिले राज्य असेल. भाजपा अध्यक्ष प्रत्येक राज्याचा दौरा करतील, सर्व बूथ युनिटच्या प्रमुखांशी, पक्षामधील सर्वात लहान संघटनात्मक संघटनांसोबत बैठका करतील. प्रत्येक राज्यातील जिल्हाप्रमुख, संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील, असे भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले.
पुढील वर्षी 4 राज्यात निवडणूका -
नड्डा यांच्या दौऱ्यासाठी राज्यांचं चार श्रेणींमध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या श्रेणीत त्या राज्यांचा समावेश असेल, ज्या राज्यांमध्ये भाजपाने मित्र पक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली आहे. दुसऱ्या श्रेणीत बिगर भाजपाशासित राज्यांचा समावेश असेल. तिसऱ्या श्रेणीत छोट्या राज्यांचा समावेश आहे. चौथ्या श्रेणीत ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या राज्यांचा समावेश असेल. पुढील वर्षीच्या उत्तरार्धात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसाम या चार राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.