महेशतला (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील महेशतला येथील फटाका कारखान्याला सोमवारी संध्याकाळी लागलेल्या भीषण आगीत तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलासह महेशतळा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामक दलाला आग विझवण्यात यश आले असून अद्याप आगीचे कारण समजू शकलेले नाही.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता : काल संध्याकाळी 5.45 वाजता ही घटना घडली. यावेळी स्थानिक लोकांना कारखान्यातून मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात सापडले होते. पोलीसांनी घटनास्थळावरून तीन जळालेले मृतदेह बाहेर काढले आहेत. कारखाना मालक भरत हाटी यांची पत्नी लिपिका हाती (52), मुलगा शंतनू हाटी (22) आणि शेजारी आलो दास (17) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत इतर अनेक जण जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
'तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती' : अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे. आगीचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन विभागाचे दक्षिण 24 परगणा संचालक अभिषेक पांडे यांनी सांगितले की, 'आग इतक्या वेगाने पसरली की आम्हाला थोडा उशीर झाला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे'.
फटाका कारखान्याकडे परवाना नाही : या दुर्घटनेवर महेशतळा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'या बाजारात आणि आसपास अनेक फटाका कारखाने आहेत. मात्र त्यांच्याकडे योग्य परवाने नाहीत. आगीचे नेमके कारण अद्याप आम्हाला समजलेले नाही. लोकांना वाचवणे ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. प्राथमिक बचाव कार्य संपल्यानंतर आम्ही आगीचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करू'.
हेही वाचा : Two leopards Death: विजेची तार अंगावर पडल्याने दोन मादी बिबट्यांचा मृत्यू