नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाला आज सकाळी संबोधित केले. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन' हा यंदाचा विषय होता. 21 व्या शकतात इथेनॉल हा भारताचा प्राधान्याचा विषय असून इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे, मोदींनी सांगितले.
पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले आहे. यापूर्वी 2030 पर्यंत मुदत देण्यात आली होती. केंद्राच्या नव्या निर्णयानुसार आता 1 एप्रिल 2023 पासून इथेनॉल मिश्रित करावं लागणार आहे.
जैवइंधनाचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत असून प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. इथेनॉलच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा संपूर्ण देशभर उभारण्यात येत आहेत. 2014 मध्ये भारतात इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापराचं प्रमाण केवळ एक ते दीड टक्का होतं. मात्र, आता ते वाढून तब्बल साडेआठ टक्क्यांवर गेलं आहे, असे मोदींनी सांगितले.
'वर्ष 2020 ते 2025 या कालावधीत भारतात इथेनॉलचे उत्पादन आणि वापर वाढविण्यासंबंधीचा आराखडाही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच महाराष्ट्राच्या पुणे शहरातील तीन ई-100 वितरण स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटनही मोदींनी केले.
इथेनॉल निर्मिती आणि वापराला चालना -
देशातले शेतकरी अधिकाधिक प्रमाणात जैवइंधनाशी संबंधित व्यवस्थेशी जोडले जात आहेत. इथेनॉल निर्मिती आणि वापराला चालना मिळाली, तर शेतकऱ्यांना विशेषतः ऊस उत्पादकांना मोठा फायदा होईल, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर करून जैवशेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांशी संवाद साधला.