नवी दिल्ली : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून (EPFO) उच्च पेन्शनसाठी अर्ज सादर करण्यासाठी डेडलाईन ठरवून देण्यात आली होती. मात्र ही डेडलाईन संपल्यानंतर आता पुन्हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 11 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ईपीएफओकडून उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात EPFO ने पात्र निवृत्तीवेतनधारकांच्या सुलभतेसाठी 15 दिवसांची शेवटची संधी देण्यात आल्याचे नमूद केले आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची 3 मे होती मुदत : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) कर्मचाऱ्यांना संयुक्त पर्यायाच्या पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 11 जुलै 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी EPFO ने 4 नोव्हेंबर 2022 रोजी पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 3 मे 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले होते. डेडलाईन संपल्यानंतर विविध पक्षांच्या मागणीमुळे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती.
केवासी करण्यात कर्मचाऱ्यांना अडचणी : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO कर्मचाऱ्यांना उच्च पेन्शनसाठी तारीख वाढवून दिली होती. मात्र कर्मचाऱ्यांना केवायसी करण्यात अडचणी येत असल्याने अनेक कर्मचारी उच्च पेन्शनपासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून उच्च पेन्शनच्या तारखेची मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. कर्मचारी उच्च पेन्शनपासून वंचित राहु नये, त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPFO ही तारीख आणखी वाढवली आहे.
हेही वाचा -