श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या काकापुरा भागामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. याठिकाणी दहशतवादी लपलेले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी याठिकाणी घेराव घातला होता. यावेळी सर्च ऑपरेशन सुरू करताच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करणे सुरू केले.
तीन दहशतवाद्यांचा खात्मा..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी याठिकाणी लपून बसले होते. या तीनही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपून बसले असण्याची शक्यता असल्यामुळे सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे.
दोन नागरिक जखमी..
यावेळी सुरू असलेल्या गोळीबारात दोन नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.