नवी दिल्ली- कोरोना महामारीमुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणखी लांबली आहे. कोरोनाच्या स्थितीत निवडणूक घेणे योग्य ठरणार नाही, असे काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत विविध नेत्यांनी मत व्यक्त केले. यापूर्वी केंद्रीय निवडणूक यंत्रणेने मागील काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी २३ जूनला निवडणूक घेण्याचा प्रस्ताव दिला होता.
देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळण्यास आणखी उशीर होणार आहे. यापूर्वी काँग्रेसच्या अध्यक्षीय निवडीकरता केंद्रीय निवडणूक समितीने वेळापत्रक तयार केले होते. या वेळापत्रकानुसार जूनअखेर काँग्रसेच्या अध्यपदाची निवड होणे अपेक्षित होते.
सुत्राच्या माहितीनुसार काँग्रेसच्या अध्यपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक काँग्रेसची कार्यकारी समिती निश्चित करणार आहे.
हेही वाचा-क्रिकेटपटू पीयूष चावलाच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन, १० दिवसांपासून सुरु होते उपचार
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया जूनपर्यंत होती अपेक्षित
काँग्रेसच्या कार्यकारी समितीत सोनिया गांधी यांनी संवाद साधल्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सूतोवाच केले आहे. त्यांनी म्हटले, की जेव्हा आपण २२ जानेवारीला भेटलो होते, तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित केले होते. त्यासाठी निवडणूक यंत्रणेचे प्रमुख मधुसुधन मिस्त्री यांनी वेळापत्रक तयार केले आहे.
हेही वाचा-पश्चिम बंगाल : तृणमूलच्या ४३ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; आज पार पडला सोहळा
२३ वरिष्ठ नेत्यांच्या पत्रानंतर अध्यक्षपदाच्या निवडीसाठी हालचाली-
काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेस अध्यक्ष निवडीची मागणी केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेची हालचाल सुरू झाली आहे. काँग्रेसच्या २३ नेत्यांनी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचीही गरजही व्यक्त केली होती.
काँग्रेसचा विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून पराभव-
नुकतेच पार पडलेली आसाम आणि केरळमधील विधानसभा निवडणूक ही काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची होती. या राज्यांमध्ये प्रचार करूनही काँग्रेसला यश मिळविता आलेले नाही. काँग्रेसचे माजी अध्यक्ष हे केरळमधील वायनाड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे केरळमधील विधानसभा निवडणूक ही काँग्रेसच्या प्रतिष्ठेची होती.